नवी दिल्ली : नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, शहेनशहा नाहीत, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. जावई रॉबर्ट वाड्रा यांच्यावर झालेले सर्व आरोप फेटाळत 'काँग्रेसमुक्त भारत' हे एक षडयंत्र असल्याचं त्या म्हणाल्या.
मोदी सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त सुरु असलेल्या जल्लोषावर त्यांनी रायबरेलीमध्ये टीका केली. 'अशाप्रकारे शोबाजी करणं मला योग्य वाटत नाही. देशात गरिबी आहे, बेरोजगारी आहे, शेतकरीही त्रस्त आहेत. अशात दोन वर्षांचं सेलिब्रेशन चुकीचं आहे. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, शहेनशहा नाहीत.' असं त्या म्हणाल्या.
भाजपचे नेते रोज नवनवी प्रकरणे घेऊन पुढे येतात आणि चुकीचे आरोप करतात. सरकारने कोणताही भेदभाव न करता चौकशी करावी, यातून सर्व काही समोर येईल, असंही सोनिया म्हणाल्या.
मध्य लंडनमधील एका घराच्या मालकीविषयी वाड्रा आणि वादग्रस्त शस्त्रास्त्र डीलर संजय भंडारी यांच्यातील संपर्काचे पुरावे आढळल्यामुळे वाड्रा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी व्यवहाराबद्दल ईडीकडे चौकशीची मागणी केली आहे.