Sonia Gandhi Nomination For Rajya Sabha : नवी दिल्ली : आगामी राज्यसभा (Rajya Sabha Elections 2024) निवडणुकांसाठी काँग्रेसनं (Congress) आपली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या माजी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) या देखील यंदा राज्यसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. सोनिया गांधींनी आज राजस्थानमधून (Rajasthan) राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) देखील उपस्थित होत्या. याव्यतिरिक्त अनेक काँग्रेस नेते आणि कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते. दरम्यान, सध्या सोनिया गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेलीच्या लोकसभा खासदार आहेत. 




गेल्या अनेक दिवसांपासून सोनिया गांधी आगामी लोकसभा निवडणूक न लढवता राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आज अखेर सोनिया गांधींनी उमेदवारी अर्ज दाखल करुन सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. अशातच उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघ म्हणजे, काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ. सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्यानंतर रायबरेलीतून कोण लढणार? अशा चर्चा सुरू आहेत. रायबरेलीतून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अद्याप काँग्रेसकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 


सोनिया गांधींच्या उमेदवारीनंतर राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे. ते म्हणाले की, "पंतप्रधान पदाची संधी मिळूनही त्याचा त्याग करणाऱ्या सोनिया गांधी यांना काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचं आम्ही मनापासून स्वागत करतो. सोनिया गांधी यांचं राजस्थानशी अतूट नातं आहे. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यावर सोनिया गांधी यांच्यासोबत आदिवासी बहुल जिल्ह्यांच्या दौऱ्यावर गेल्या आहेत. राजस्थानमधील दुष्काळाच्या काळात राजीव गांधींनी पंतप्रधान म्हणून स्वत: गाडी चालवून 9 दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केला, तेव्हाही सोनिया गांधी त्यांच्यासोबत होत्या."


राज्यासाठी आनंदाची बाब : अशोक गेहलोत


अशोक गेहलोत पुढे म्हणाले की, "माझ्या पहिल्या कार्यकाळात मला चार वेळा भीषण दुष्काळ आणि दुष्काळाचा सामना करावा लागला, तेव्हा दुष्काळ निवारणाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी सोनिया गांधी यांनी अनेक जिल्ह्यांना भेटी दिल्या, ज्याला राजस्थानची जनता अजूनही विसरलेली नाही. यूपीए सरकारच्या काळात सोनियांनी NAC चेअरपर्सन या नात्यानं राजस्थानमध्ये रिफायनरी, मेट्रो यासारखे मोठे प्रकल्प आणण्यासाठी आणि केंद्राकडून सहकार्य मिळवण्यासाठी राजस्थानच्या हिताचं रक्षण करण्यासाठी नेहमीच जोरदार मागणी केली. आज त्यांची राजस्थानमधून राज्यसभेचे उमेदवार म्हणून घोषणा होणं, ही संपूर्ण राज्यासाठी आनंदाची बाब असून या घोषणेनं सर्व जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर, महाराष्ट्रातून चंद्रकांत हांडोरे राज्यसभेच्या रिंगणात