नागपूर : या वर्षाच्या अखेरपर्यंत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी तुरुंगात असतील, असं भाकित भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. तर गांधी कुटुंबाला नेहमीच आपल्या निशाण्यावर ठेवणाऱ्या स्वामींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना सर्कसचा सिंह असं म्हटलं आहे.


आणीबाणीला 43 वर्ष पूर्ण होत असताना नागपुरात लोकतंत्र या विषयावर लोकतंत्र सेनानी संघाने आयोजित केलेल्या एका व्याख्यानात सुब्रमण्यम स्वामी बोलत होते. यावेळी विकिलिक्सची आठवण करून देत हिंदू टेररचा भयावह बडगा कसा राहुल गांधी यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला हे त्यांनी सांगितलं.

तुरुंगात जाणाऱ्या नेत्यांमध्ये पी. चिदंबरम, त्यांचा मुलगा, बायको, सून आणि मामा तसेच शशी थरूर हे सर्व राहतील, असंही सुब्रमण्यम स्वामी म्हणाले. त्यामुळे काँग्रेस आपली कार्यकारिणी बैठक तिहार जेलमध्ये घेऊ शकेल असा टोलाही त्यांनी लगावला.

सुब्रमण्यम स्वामी अनेकदा मोदी सरकारवर टीका केल्यामुळे चर्चेत असतात. मात्र आजच्या कश्मीरच्या परिस्थितीला पाहता त्यांनी आपल्या सरकारने उचललेल्या पाऊलांचं कौतुक केलं. भारतीय सैन्याला सूट दिल्यामुळे आता काश्मीर नक्कीच हाती येईल आणि पुढच्या निवडणुकीत जिंकवून द्या, पाकिस्तानचे चार तुकडेही करु, असं ते म्हणाले.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील कलम 370 ला घेऊन आपल्या स्वतःच्या मोदी सरकारलाही त्यांनी चिमटा काढला. यासाठी फक्त कॅबिनेटचा निर्णय हवा आहे. संसदेच्या सहमतीची कायद्याप्रमाणे गरज नाही, असा दावा त्यांनी केला.