रामेश्वरम : हवाई दलाच्या बेपत्ता झालेल्या AN-32 विमानाचे अवशेष सापडल्याची शक्यता आहे. शोध पथकाला नुकतेच बंगालच्या उपसागरात विमानाचे काही अवशेष सापडले आहेत. विमान बेपत्ता झाल्यानंतर 6 दिवसांनी हे अवशेष सापडले आहेत. त्यामुळे हरवलेल्या विमानाचेच ते अवशेष आहेत का, याची खातरजमा करण्याचे काम सुरु असल्याची माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली आहे.

 

भारतीय हवाई दलाचे AN-32 हे मालवाहू विमान 22 जुलै रोजी उड्डाण केल्यानंतर अवघ्या 16 मिनिटांत बेपत्ता झालं होतं. या विमानातून 29 जण प्रवास करत होते. 17 जहाजं, 23 विमानं आणि एका पाणबुडीच्या साहाय्याने बेपत्ता विमानाचा शोध घेतला जात आहे.

 

दरम्यान, बंगालच्या उपसागरात विमानाचे काही अवशेष सापडले आहे. मात्र त्याबद्दल ठोस माहिती उपलब्ध झाली नसल्याने या अवशेषांची खातरजमा सुरु असल्याचं पर्रिकर म्हणाले. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.