नवी दिल्ली: पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटांमुळे सगळेजण सैरभैर झाल्याचं चित्र आहे. एकीकडे नागरिक नोटा बदलून घेण्यासाठी बँकांच्या दारात गर्दी करत आहेत. तर दुसरीकडे चोरट्यांच्या चेहऱ्यावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

बाईकस्वार सोनसाखळी चोरट्यांना मोदींच्या निर्णयाचा फटका बसला. दिल्लीजवळच्या ग्रेटर नोएडा परिसरात सोनसाखळी चोरट्यांनी एका कामगाराचं पाकिट मारलं. चोरटे बाईकवर असल्यामुळे तात्काळ तिथून पळून गेले. मात्र बाईकवरच त्यांनी पाकिटातील पैसे पाहिले.

त्या पाकिटात 1500 रुपये होते, मात्र सर्व नोटा पाचशे रुपयांच्या होत्या. एरव्ही कोणीही पाचशेच्या नोटा पाहून हरखून जातो. मात्र चोरटे पाचशेच्या नोटा पाहून चांगलेच वैतागले.

त्यांनी परत बाईक वळवली आणि ज्याचं पाकिट मारलं, त्या कामगाराजवळ नेली. वैतागलेल्या चोरट्यांनी पाकिट परत केलं, पण त्यांची मग्रुरी दाखवली. चोरट्यांनी त्या कामगाराच्या कानशिलात लावून, 100 च्या नोटा का ठेवल्या नाहीत असा जाबही विचारला.

विकास कुमार असं कामगाराचं नाव असून, तो ग्रेटर नोएडा परिसरात बांधकाम मजूर म्हणून काम करतो.