मुंबई : सिगरेटच्या पाकिटावरील वैधानिक इशारा वाचूनही जर तुम्ही सिगरेट सोडण्याच्या विचारात नसाल, तर तुम्हाला खडबडून जागं करणारी एक माहिती आहे. सिगरेटमुळे तुमच्या खिशाला अक्षरशः भगदाड पडत आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या एका सर्वेक्षणानुसार चेन स्मोकर्सना थोडंथोडक्या नव्हे एक कोटींचा फटका बसतो.


 
31 मे रोजी 'जागतिक तंबाखू विरोधी दिवसा'च्या निमित्ताने ही माहिती जाहीर करण्यात येत आहे. जर तुम्ही 30 वर्षांचे असाल आणि दिवसाला 5 सिगरेट ओढत असाल, तर तुम्ही वयाची साठी गाठेपर्यंत तुमचं एक कोटी रुपयांचं नुकसान झालेलं असतं. सिगरेटची किंमत सरासरी 10 ते 15 रुपये असते.

 
प्रत्येक सिगरेटचे 12 रुपये धरले आणि दिवसाला पाच सिगरेटचं सेवन केल्याचं मानलं, तर दिवसाला तुम्ही 60 रुपयांचा धूर उडवता. म्हणजेच महिन्याला 1800 रुपयांचं नुकसान होतं. सिगरेटची किंमत स्थिर नसून गेल्या 4 वर्षांत दरवर्षी सिगरेटच्या दरात 20 टक्क्यांची वाढ होते. तंबाखूजन्य पदार्थांवरील कर याच वेगाने वाढत राहतील. त्यामुळे सिगरेटच्या किमतीत वार्षिक 8 टक्क्यांची वाढ धरली आहे. याप्रमाणे 30 वर्षांच्या कालावधीत (तिशी ते साठी) तुम्ही 24.47 लाख रुपये सिगरेटवर खर्च केलेले असतात.

 
यातील महत्त्वाचा भाग असा की, हे 24.47 लाख रुपये सिगरेटवर खर्च न करता गुंतवले असते (बँक किंवा अन्य ठिकाणी) तर 9 टक्के व्याजाच्या हिशोबाने 30 वर्षांत 69.23 लाख रुपये मिळाले असते.

 

धूम्रपानाचे तोटे सांगण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञाची आवश्यकता नसते. ब्राँकायटिस, अस्थमा, फुफ्फुसांचे आजार ते हृदयविकार आणि कर्करोग असे अनेक त्रास उद्भवू शकतात. महिन्याला 400 रुपये डॉक्टरांची फी धरली आणि वैद्यकीय उपचार, औषधं इत्यादी मध्ये वार्षिक 12 टक्के वाढ मानली तर 30 वर्षांमध्ये 11.59 लाख रुपये खर्च होतात. मात्र डॉक्टरांवर हा खर्च केला नसता आणि ती रक्कम गुंतवली असती तर 9 टक्के व्याजाच्या हिशोबाने 30 वर्षांत 26.70 लाख रुपये मिळाले असते.

 
दुसरीकडे हेल्थ इन्शुअरन्समध्ये पैसे गुंतवताना तुम्ही स्मोकर असल्याचं लपवणं निव्वळ अशक्य असतं. त्यामुळे नॉन-स्मोकर्सच्या तुलनेत गुंतवणुकीत तुम्ही 7.52 लाख रुपयांचं नुकसान करुन घेत असता.

 

 

सिगरेटमुळे तुमचं आयुष्य कमी होतं, असं म्हटलं जातं. एका सिगरेटमुळे तुम्ही 12 मिनिटांचं आयुष्य गमावता. म्हणजेच एक दिवस धूम्रपान केल्यावर तुमचं एका तासाचं आयुष्य कमी होतं. तर 24 वर्ष धूम्रपान करत राहिल्यास तुम्ही एक वाढदिवस कमी साजरा करता. त्यामुळे सिगरेट की एक कोटी रुपयांसह आरोग्यदायी आयुष्य, ही निवड तुम्हीच करायची आहे.