नवी दिल्ली : आसाममध्ये मिळालेल्या विजयानंतर आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजपने जपून पावलं टाकायचं ठरवलं आहे.  उत्तर प्रदेशसाठी भाजप केंद्रीय मंत्री स्मृती ईराणींऐवजी माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना पसंती देण्याची शक्यता आहे.

 

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकत्याच पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत मायावतींना टक्कर देण्यासाठी कल्याण सिंह यांना मैदानात उतरवण्याचा प्रस्ताव दिल्याचं समजतंय. त्याला पक्षाध्यक्ष अमित शाह यांनीही सहमती दिल्याचं कळंतय. आनंद बाजार पत्रिकाने यासंदर्भातलं वृत्त दिलंय.

 

सूत्रांच्या मते, कल्याणसिंह मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जरी नसले तरी उत्तर प्रदेशातल्या प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात येणार आहे. यासाठी निवडणुकीआधी कल्याण सिंह आपल्या राज्यपालपदाचा राजीनामा देऊन प्रचाराची धुरा सांभाळण्याची शक्यता आहे.

 

कल्याण सिंह सध्या राजस्थानचे राज्यपाल आहेत. मात्र उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी ते राजीनामा देऊन भाजपची धुरा सांभाळू शकतील.