नवी दिल्ली : हवामानाचा अंदाज वर्तवणारी संस्था 'स्कायमेट'ने सरासरीपेक्षा मान्सून कमी होण्याचा सुधारित अंदाज वर्तवला आहे. सरासरीच्या 92 टक्के पाऊसमानाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. स्कायमेटच्या सुधारित अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र वाढ झाली आहे.


स्कायमेटने जारी केलेल्या रिपोर्टनुसार, आतापर्यंत संपूर्ण देशात सरासरीपेक्षा सहा टक्के कमी पाऊस  झाला आहे. ऑगस्ट महिन्यात मान्सूनचा प्रभाव कमी असणार आहे, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. तसेच यावर्षी 92 टक्के पावसाचा सुधारित अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. याआधी स्कायमेटने 96 ते 104 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता.


स्कायमेटनुसार उत्तरप्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये यावर्षी मान्सूनचा प्रभाव कमी आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने ऑगस्ट महिन्यात 88 टक्के पावसाचा अंदाज आहे. ऑगस्ट महिन्यात 96 टक्के पावसाचा सुधारित अंदाज स्कायमेटने वर्तवला होता.


सप्टेंबर महिन्यात 93 टक्के पावसाचा अंदाज आता स्कायमेटने वर्तवला आहे. तर याआधी स्कायमेटने सप्टेंबरमध्ये सरासरी 101 टक्के अंदाज वर्तवला होता. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी होण्याची शक्यता 60 टक्के आहे. तर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता 20 टक्के आहे.


हवामान विभागानुसार, ईशान्य भारतातील राज्यांमध्ये पावसाचा जोर कमी आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत बिहारमध्ये 23 टक्के, झारखंडमध्ये 24 टक्के, अरुणाचल प्रदेशमध्ये 37 टक्के, आसाममध्ये 27 टक्के, मेघालयमध्ये 43 टक्के आणि मणिपूरमध्ये 64 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.