नवी दिल्लीः  आयटीआयचा कोर्स केलेल्या किंवा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता अच्छे दिन येणार असल्याचं चित्र आहे. आयटीआय पास असलेल्या विद्यार्थ्यांना आता दहावी आणि बारावी पास गृहित धरलं जाणार आहे. केंद्र सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.


 

 

मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि कौशल्य विकास मंत्रालय यांच्यात महत्त्वाचा करार झाला आहे. या करारानुसार आयटीआय पास विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावी पास असल्याचं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे.

 

 

आयटीआयच्या विद्यार्थांना असा फायदा होईल


आयटीआयचा कोर्स पूर्ण केल्यास आता प्रमाणपत्रासोबतच दहावी आणि बारावी पास असल्याचं प्रमाणपत्रही दिलं जाणार आहे. एखाद्या विद्यार्थाने दहावीनंतर कोर्स पूर्ण केल्यास त्याला बारावी पास गृहित धरलं जाईल. तर इयत्ता आठवी नंतर आयटीआय पूर्ण केल्यास दहावी पास गृहित धरलं जाणार आहे.

 

 

देशभरात लवकरच 1500 आयटीआय केंद्र

केंद्र सरकारने देशातील विविध 2500 विभागांमध्ये आयटीआय केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या विभागामध्ये सध्या कौशल्य विकास आणि तांत्रिक शिक्षणाची कसलीही व्यवस्था नाही, अशा भागात हे केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. यापैकी 1500 आयटीआय केंद्र सुरु करण्याच्या प्रस्तावाला लवकरच कॅबिनेटची मंजुरी मिळवण्यात येणार आहे. सर्व आयटीआय सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी अर्थात पीपीपी या तत्त्वावर उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी दिली.

 

 

एवढंच नव्हे तर या वर्षापासून विद्यापीठांच्या धरतीवर आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा दीक्षांत समारंभाचं आयोजन करण्यात येणार आहे. शक्य झाल्यास पहिल्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित राहतील, असंही रुडी यांनी सांगितलं.

 

 

आयटीआय करुन दहावी किंवा बारावीची डिग्री नसल्यामुळे नोकरीसाठी विद्यार्थ्यांची अडवणूक होते. त्यामुळं अनेकांना आयटीआय केल्याचा पश्चात्तापही होतो. मात्र केंद्र सरकारच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळं आयटीआयच्या विद्यार्थांना दिलासा मिळेल अशी आशा आहे.