नवी दिल्ली : गुगलला फक्त जगातलंच नाही, तर जगाबाहेरचंही सगळं ठाऊक आहे, असं तुम्हाला वाटतं का? तर तुमचा समज केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने खोटा ठरवला आहे. जगात अशी एक गोष्ट आहे, जी गुगललाही माहित नाही, मात्र ती भारतातील सर्वोत्तम शिक्षण संस्था आहे. आणि या संस्थेचं नाव आहे 'जिओ इन्स्टिट्यूट'


केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने सार्वजनिक क्षेत्रातील तीन आणि खाजगी क्षेत्रातील तीन अशा भारतातील एकूण सहा प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये आयआयटी मुंबईचा समावेश आहे. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे जिओ इन्स्टिट्यूट अशा संस्थेचाही यात समावेश आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करुन या शैक्षणिक संस्थांच्या नावांची घोषणा केली. तज्ज्ञांच्या समितीने देशातील सर्वोच्च गुणवत्ता असलेल्या सहा शैक्षणिक संस्थांची निवड केली आहे.

आयआयटी मुंबई (महाराष्ट्र), आयआयटी दिल्ली (दिल्ली) आणि आयआयएससी बंगळुरु (कर्नाटक) यांचा समावेश आहे.


खाजगी क्षेत्रातील मनिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन (कर्नाटक), बिट्स पिलानी (राजस्थान) आणि जिओ इन्स्टिटयूट या तीन शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.


जागतिक गुणवत्ता क्रमवारीत स्थान मिळवण्यासाठी सरकारी संस्थांना केंद्र शासनाकडून पुढील पाच वर्षांसाठी एक हजार कोटींचा निधी देण्यात येणार असल्याची माहितीही जावडेकरांनी दिली.

जिओ इन्स्टिट्यूटची निवड सर्वोत्तम संस्थांमध्ये झाल्यामुळे सोशल मीडियावर यूझर्सनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. रिलायन्स फाऊण्डेशनने संशोधन क्षेत्रात विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव आखल्याची माहिती 'पीटीआय'ने दिली आहे.

विद्यापीठासाठी जागेची उपलब्धता, अत्युच्च शैक्षणिक पात्रता आणि दीर्घ अनुभव असलेली कोअर टीम, विद्यापीठासाठी पुरेसा निधी, नियोजनबद्ध दूरदृष्टी अशा चार निकषांमध्ये केवळ जिओ इन्स्टिट्यूट बसत असल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिलं आहे.

जिओ इन्स्टिट्यूट नेमकी कुठे आहे, तिचं लोकेशन काय, यावरुनही मंत्रालयात जबरदस्त गोंधळ सुरु आहे. पीआयबी अधिकाऱ्यांनी आधी ही संस्था पुण्यात असल्याचं सांगितलं, तर नंतर ती नवी मुंबईत असल्याचा साक्षात्कार झाला. पुण्यात हेडक्वार्टर असणार, नवी मुंबईत काम चालणार, अशी सारवासारव करण्यात आली.