गुगलकडून बंगळुरुच्या 22 वर्षीय आदित्यला 1.2 कोटींचं पॅकेज
एबीपी माझा वेब टीम | 09 Jul 2018 06:57 PM (IST)
‘गुगलने माझी निवड केल्याने मी खुश आहे. गुगलमध्ये काम करताना अनेक नव्या गोष्टी शिकता येतील,असं मला वाटतं,’ अशी आशा आदित्य पालिवालने व्यक्त केली आहे.
मुंबई : बंगळुरुच्या आदित्य पालिवाल या विद्यार्थ्याला गुगलने एक कोटी 20 लाखांचं वार्षिक पॅकेज दिलं आहे. आदित्य बंगळुरुच्या आंतरराष्ट्रीय माहिती आणि तंत्रज्ञान संस्थेचा (IIIT-B) विद्यार्थी आहे. आदित्य पालिवाल या जुलैपासूनच गुगलच्या कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन विभागात काम करणार आहे. कॉलेजच्या दीक्षांत सोहळ्यात रविवारी त्याला प्रमाणपत्र देण्यात येईल. मूळचा मुंबईकर असलेल्या आदित्यने इंटिग्रेटेड एमटेकचं शिक्षण घेतलं आहे. ‘गुगलने माझी निवड केल्याने मी खुश आहे. गुगलमध्ये काम करताना अनेक नव्या गोष्टी शिकता येतील,असं मला वाटतं,’ अशी आशा आदित्य पालिवालने व्यक्त केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन विभागासाठी गुगलने जगभरातील तब्बल 3098 विद्यापीठांतून पहिल्या स्तरात 50 हजार विद्यार्थ्यांची निवड केली. दुसऱ्या स्तरात गुगलने या विभागासाठी सहा हजार विद्यार्थ्यांची निवड केली होती. आता गुगलने याच संशोधन विभागासाठी अंतिम 50 विद्यार्थ्यांची निवड केली, ज्यामध्ये आदित्यनेही बाजी मारली. कॉम्प्युटर लँग्वेज कोडिंगची प्रतिष्ठित स्पर्धा असलेल्या एसीएम इंटरनॅशनल कॉलेजिएट प्रोग्रामिंग कॉन्टेस्ट (ICPC) 2017-18 मध्ये आदित्य फायनलिस्ट ठरला होता.