मुंबई : भारताचा 73वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत आहे. देशातील प्रत्येक नागरिक देशाचा एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. फेसबुक, ट्विटरसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळत आहे. मात्र याचवेळी गायक अदनान सामीने एका पाकिस्तानी ट्विटर युझरला दिलेलं उत्तर चागंलीच वाहवा मिळवत आहे.

काय आहे प्रकरण?
1947 मध्ये भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तानचा जन्म झाला. 14 ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन. त्यामुळे 14 ऑगस्टला पाकिस्तानी नागरिकही आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत होतं. मात्र पाकिस्तानमधील असीम अली रझा नावाच्या एका कुरापती ट्विटर युझरने गायक अदनान सामील उद्देशून ट्वीट केला की, "तू स्वातंत्र्यदिनानिमित्त ट्वीट का करत नाहीस?"


यावर अदनान सामीने दिलेल्या उत्तराने सगळ्यांची मनं जिंकली. अदनान म्हणाला की, "हो करणार....उद्या!" अदनानच्या उद्याचा अर्थ म्हणजे 15 ऑगस्ट रोजी, अर्थात भारताच्या स्वातंत्र्यदिनाला.


यानंतर अदनानच्या समर्थनार्थ अनेक भारतीयांनी त्यांचं कौतुक केलं.










1 जानेवारी 2016 पासून अदनान सामी भारतीय नागरिक
अदनान सामी 1 जानेवारी 2016 पासून भारतीय नागरिक बनला. पाकिस्तानातील लाहौरमध्ये जन्मलेला अदनान सामी 13 मार्च 2001 रोजी भारतात आला होता. इस्लामाबादेतील भारतीय उच्चाधिकाऱ्यांनी दिलेल्या व्हिसानुसार त्याला पर्यटक म्हणून वर्षभर राहण्याची परवानगी होती. त्यानंतर अनेक वेळा त्याचा व्हिसा रिन्यू करण्यात आला. 27 मे 2010 रोजी इश्यू केलेल्या त्याच्या पाकिस्तानी पासपोर्टची मुदत 26 मे 2015 रोजी संपली. पाकिस्तान सरकारने पासपोर्टला मुदतवाढ दिली नव्हती. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोनात आपलं भारतातील वास्तव्य कायदेशीर करावं, अशी मागणी सामीने भारताकडे केली होती. ती मागणी भारताने मान्य केली. अखेर 1 जानेवारी 2016 रोजी त्याला भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आलं. तत्कालीन गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी अदनान सामीला भारतीय नागरिकत्वाची कागदपत्रं दिली. 2000 च्या सुमारास अदनान सामीचे 'कभी तो नजर मिलाओ' आणि 'लिफ्ट करा दे' या म्युझिक व्हिडीओंनी चांगलाच धुमाकूळ घातला होता.