बेळगाव : ऊसदर वाढवा नाहीतर मोबाईल टॉवरवरुन खाली उतरणार नाही अशी धमकी देत बेळगावात एका शेतकऱ्याने 'शोले'स्टाईल आंदोलन केलं. शेतकऱ्याच्या या भूमिकेमुळे अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते.


बेळगावात सुवर्णसौध येथे सध्या कर्नाटकचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. सुवर्णसौधसमोर अनेक संघटना आपल्या मागणीसाठी दररोज आंदोलन छेडत आहेत. चंद्रा नावाच्या शेतकऱ्याने मोबाईल टॉवरवर चढून ऊसदरवाढीची घोषणा करेपर्यंत खाली न उतरण्याची भूमिका घेतली. तुमकूर जिल्हयातील कालकुप्पी गावातून चंद्रा आला होता.

बंदोबस्ताच्या तणावाखाली असलेल्या पोलिसांच्या ताणात आणखी भर पडली. विधिमंडळात उपस्थित असणाऱ्या माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना ही घटना समजल्यावर ते बाहेर आले आणि त्यांनी चंद्रा याला ऊसदराविषयी सभागृहात विषय उपस्थित करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर चंद्रा मोबाईल टॉवरवरुन खाली उतरला. खाली उतरल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.