पाकिस्तानने गुडघे टेकले, भारतीय डीजीएमओशी हॉटलाईनवर चर्चा
एबीपी माझा वेब टीम | 24 Nov 2016 08:16 AM (IST)
नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तरानंतर बुधवारी संध्याकाळी पाकिस्तानचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल साहिर शमसाद मिर्झा यांनी भारतीय डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासंदर्भात दोघांमध्ये हॉटलाईनवर चर्चा झाली. मात्र जोपर्यंत पाकिस्तान शस्त्रसंधीचं उल्लंघन आणि घुसखोरी बंद करणार नाही, तोपर्यंत भारताकडून हल्ले सुरुच राहतील, असं भारतीय डीजीएमओ रणबीर सिंह यांनी स्पष्ट केलं. जम्मू काश्मीरच्या माछिलमध्ये भारतीय सेना पाकिस्तानी लष्कराच्या नापाक कारवायांना सडेतोड उत्तर दिलं. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त करत कॅप्टनसह तीन सैनिकांचा खात्मा केला आहे. भारतीय सैन्याच्या प्रवक्त्यांनुसार, पाकिस्तानविरोधातील 'दंडात्मक कारवाई'नंतर बुधवारी संध्याकाळी पाकिस्तानचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल साहिर शमसाद मिर्झा यांनी हॉटलाईनवर बोलण्याची विनंती केली. ही चर्चा नियोजित नव्हती. प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी डीजीएमओनी भारताच्या गोळीबारात पाकिस्तानी नागरिकांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. यावर भारतीय डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी नागरिकांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला. तसंच जिथे शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे, तिथेच भारताने पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त केल्या, असंही स्पष्ट केलं. याशिवाय पाकिस्तानच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडणाऱ्या भारतीय नागरिक आणि सैनिकांचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.