नवी दिल्ली: शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला केलेली मारहाण ताजी असतानाच, तिकडे दिल्लीतच शिवसैनिकाने एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांना मारहाण केल्याचं सांगण्यात येत आहे.

गोरख गोपाळ खर्जुल असं या शिवसैनिकाच नाव आहे. गोरख खर्जुल मूळचे नाशिकचे आहेत.

गोरख खर्जुल हे नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांचे कार्यकर्ते आहेत. ते दिल्लीत संसद भवन बघायला गेले होते. त्यावेळी त्यांना समोरुन येणारे MIM खासदार असदुद्दीन ओवेसी दिसले.



खर्जुल यांनी ओवेसींची भेट घेऊन तुम्ही वादग्रस्त वक्तव्य का करता, असं विचारलं, त्यावेळी ओवेसींनी बाचाबाची केली, असा दावा खर्जुल यांनी केला.

"संसदेचं कामकाज पाहायला आलो होतो. पार्किंगमध्ये गाडीची वाट पाहत होतो. त्यावेळी ओवेसी दिसले. ते वादग्रस्त विधान का करतात असं विचारलं. यावर त्यांनी उलटसुलट उत्तर दिलं. त्यामुळे मी त्यांना कानफाडत लगावली. या घटनेचा मला पश्चात्ताप नाही. कोणत्याही कारवाईला सामोरं जायला तयार आहे", असं गोरख खर्जुल यांनी सांगितलं.

असदुद्दीन ओवेसी यांचं एबीपी माझाकडे स्पष्टीकरण

दरम्यान, याबाबत एबीपी माझाने असदुद्दीन ओवेसी यांच्याशी संपर्क साधला असता, ओवेसी यांनी अशी काही मारहाण झालीच नसल्याचा दावा केला. मी गाडीत बसलो होतो, त्यावेळी बाहेर काहीतरी गडबड सुरु होती. मी त्याकडे दुर्लक्ष केलं. मला या प्रकाराबाबत काही बोलायचं नाही. हे लोक प्रसिद्धीसाठी असे प्रकार करत असतील, असं ओवेसी म्हणाले.

कोण आहे गोरख खर्जुल?

  •  गोरख खर्जुल हे नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांचे कार्यकर्ते आहेत.

  •  मूळचे देवळालीतील रहिवाशी आहेत.

  • एका शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याचा दावा गोरख खर्जुल यांनी केला आहे.

  • आपण स्वत:ही शेतीच करत असल्याचं खर्जुल यांनी सांगितलं.