चंद्राबाबूंशी गुफ्तगू नाही, शिवसेनेनं फोनचर्चेचं वृत्त फेटाळलं
एबीपी माझा वेब टीम | 05 Feb 2018 10:10 AM (IST)
एनडीएतील इतर काही नेत्यांनी ‘मातोश्री’चा फोन फिरवला, हे लवकरच आम्हाला वृत्तपत्रांतून कळेल असं म्हणत उद्धव ठाकरे बरसले.
मुंबई : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे सर्वसर्वा चंद्राबाबू नायडू यांच्याशी फोनवरुन चर्चा झाल्याचं वृत्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेटाळून लावलं आहे. 'सामना' या मुखपत्रातून उद्धव यांनी माध्यमांवर ताशेरे ओढले आहेत. एनडीएतील इतर काही नेत्यांनी ‘मातोश्री’चा फोन फिरवला, हे लवकरच आम्हाला वृत्तपत्रांतून कळेल असं म्हणत उद्धव ठाकरे बरसले. उद्धव ठाकरे आणि चंद्राबाबू नायडू यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याची बातमी 'टाईम्स ऑफ इंडिया' या वर्तमानपत्राने दिली होती. 'सामना'तून उद्धव काय म्हणाले? सध्या जुन्या मित्रांना हाडवैरी ठरवून जी सत्तालोलुपता दाखवली जात आहे ती उबग आणणारी आहे. आम्हीच ही ‘उबग’ स्पष्टपणे समोर आणली, पण आता चंद्राबाबूंनीही ती खदखद बाहेर काढली. चंद्राबाबूंना आमच्या शुभेच्छा आहेत, पण त्यांच्या राजकीय मसलती त्यांनीच कराव्यात. महाराष्ट्रात ममता बॅनर्जी मध्यंतरी येऊन गेल्या. त्यांनाही सदिच्छा म्हणून भेटलो. आम्ही त्यांना भेटलो यावरही अनेकांनी तर्ककुतर्कांची फवारणी केली. आता चंद्राबाबूंच्या बाबतीत तेच सुरू आहे. एनडीएतील इतर काही नेत्यांनी ‘मातोश्री’चा फोन फिरवलाय हे लवकरच आम्हाला वृत्तपत्रांतून कळेल अशी आशा आम्ही बाळगत आहोत.