नवी दिल्ली : शिवसेना जनतेसोबत आहे. आम्ही जनतेच्या मनातीलच प्रश्न उपस्थित करतो, असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर शिवसेना मवाळ नसल्याचं स्पष्ट केलं. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज एक महिना झाला. पंतप्रधानांनी 8 नोव्हेंबर रोजी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द झाल्याची घोषणा केली होती. पण अजूनही चलन तुटवड्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, महिना झाला तरी अडचणी कमी झाल्या नाहीत. नोटाबंदी निर्णयाच्या तयारीत त्रुटी राहिल्याने लोकांना त्रास होत आहे. शिवाय या नोटाबंदीच्या निर्णयाबाबत अर्थतज्ज्ञही साशंक आहेत. नोटाबंदीचा निर्णय चुकीचं असल्याचं मत या तज्ज्ञांनी मांडलं आहे.
30 डिसेंबरपर्यंत वाट पाहू!
नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी 50 दिवस कळ सोसण्याचं आवाहन केलं होतं. आज 30 दिवस पूर्ण झाले आहे. त्यामुळे आणखी 20 दिवस पाहू, त्यानंतर काय भूमिका घ्यायचं ते ठरवू, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. याशिवाय शेतकऱ्यांना त्यांच्या बँकेतील पैसा मिळायला हवा, असं आवाहनही त्यांनी केल.
नोटांबदीमुळे दहशतवाद थांबला का?
काळ्या पैशांवरील सर्जिकल स्ट्राईकनंतरही काळापैसा वाढत जाईल. नोटाबंदीमुळे दहशतवादी हल्ले थांबले, असा दावा मोदींनी केला होता. पण दहशतवादी हल्लेकुठे थांबले?, असा सवालही यावेळी शिवसेना पक्षप्रमुखांनी केली.
ऑनलाईन सर्व्हेमध्ये परग्रहावरील लोकांचा सहभाग!
पंतप्रधानांच्या ऑनलाईन सर्व्हेमध्ये कोणी सहभाग घेतला याची कल्पना नाही. पण परग्रहावरच्या लोकांनीही यात सहभाग घेतल्याचं ऐकलं होतं, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.