नवी दिल्ली : मुलायम सिंह यांचे लहान भाऊ आणि अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव हे नवीन पक्षाची स्थापन करणार आहेत. विशेष म्हणजे शिवपाल यांच्या नव्या पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह असतील.
‘समाजवादी सेक्युलर मोर्चा’ असे शिवपाल यांच्या नव्या पक्षाचं नाव असेल. या नव्या पक्षाचे नेतृत्त्व मुलायम सिंह यादव करणार असून, ते सध्या अखिलेश यांच्या समाजवादी पक्षाच्या मार्गदर्शक मंडळात आहेत.
नव्या पक्षाच्या स्थापनेबाबत माहिती देताना शिवपाल यादव म्हणाले, “नेताजींना (मुलायम सिंह) त्यांचा सन्मान परत मिळवून देण्यासाठी आणि समाजवाद्यांना एकत्र आणण्यासंदर्भात लवकरच घोषणा केली जाईल.”
उत्तर प्रदेशातील निवडणुकांआधीच समाजवादी पक्ष दोन गटात विभागला गेला होता. एक गट अखिलेश यादव, तर दुसरा गट मुलायम सिंह यादव यांच्या बाजूने होता.
दोन्ही गटामध्ये पक्षाच्या चिन्हावरुनही मोठा वादंग माजला होता. समाजवादी पक्षातील वादादरम्यान अखिलेश यांच्यासोबत रामगोपाल यादव, तर मुलायम सिंह यांच्यासोबत शिवापाल यादव होते.
निवडणूक आयोगाने मुलायम सिंह यांचा दावा फेटाळून ‘सायकल’ चिन्ह अखिलेश गटाला दिलं. यादरम्यान अखिलेश गटाने लखनौमध्ये एक अधिवेशन बोलावून स्वत:ला राष्ट्रीय अध्यक्ष घोषित केलं आणि मुलायम सिंह यादव यांना पक्षाच्या मार्गदर्शक मंडळात बसवलं होतं.
समाजवादी पक्षातील वाद सुरु असतानाच काही दिवसांवर उत्तर प्रदेशात निवडणुका होत्या. त्यामुळे मुलायम सिंह यादव यांनी कोणत्याच हालचाली केल्या नाहीत आणि ते पक्षातच राहिले. मात्र, निवडणुकीत पक्षाच्या प्रचारासाठी मुलायम सिंह यांनी केवळ दोनच जाहीर सभा घेतल्या.
अखेर शिवपाल यादव यांनी समाजवादी सेक्युलर मोर्चाची घोषणा करत अखिलेश यादव यांच्यासमोर उत्तर प्रदेशात नवं आव्हान निर्माण केलं आहे.