बुलडाणा : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केलेलं 'भीम' अॅप जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाशी संबंधित असेल, तर असे एकेरी नाव घेता येणार नाही. आम्ही नरेंद्र मोदी यांचा निषेध करतो." असे म्हणत माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे अॅपवर आक्षेप नोंदवला आहे.
सरकारच्या नोटाबंदीच्या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने 6 ते 8 जानेवारीला होऊ घातलेल्या राज्यव्यापी आंदोलनाची तयारी करण्यासाठी शिवाजीराव मोघे बुलडाण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना मोघेंनी भीम अॅपच्या नावावर आक्षेप घेतला.
नोटाबंदीचा प्रयोग हा तयारीविना आणि हेकेखोरपणाचा असून त्याचा त्रास सर्वांनाच झालेला आहे, असे सांगून मोघे म्हणाले की, "या बाबतीत किती यातना झालेल्या आहेत आणि आता याही पुढे होणार आहे. या बाबतीत काँग्रेस जनजागरण करणार आहे", असेही ते म्हणाले.