गुरुग्राम : शिवसेना आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी हरियाणातील गुरुग्राममध्ये चिकन-मटणची विक्री करणारी 400 दुकानं बंद पाडल्याची माहिती आहे. नवरात्रीच्या काळात मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेने केली होती.
'हिंदुत्ववादी संघटनांचे तीनशे सदस्य गुरुग्राममधील जुन्या रेल्वे रोडवरील शंकराच्या मंदिराजवळ बुधवारी जमा झाले. त्यानंतर शहरात विविध ठिकाणी जाऊन त्यांनी मांस विक्रीची दुकानं बंद पाडली' अशी माहिती शिवसेनेच्या गुरुग्राम शाखेचे प्रमुख गौतम सैनी यांनी 'पीटीआय'ला दिली आहे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माहिती आहे का, किंवा याविषयी त्यांची प्रतिक्रिया काय, हे अद्याप समजू शकलेलं नाही.
सुरत नगर, अशोक विहार, सेक्टर 5 आणि 9, पतौडी चौक, जॅकॉबपुरा, सदर बाजार, खंडसा अनाज मंडी, बस स्टँड, डीएलएफ एरिआ, सोहन या भागातील चिकन आणि मटणची विक्री करणारी दुकानं सेनेने बंद पाडल्याचं स्थानिकांनी सांगितलं.
2014 मध्ये केंद्रात आणि हरियाणात भाजप सत्तेत आल्यानंतर नवरात्रीच्या काळात बरेच वेळा खटके उडतात, त्यामुळे 50 टक्के मांस विक्रीची दुकानं बंद ठेवली जातात, असंही स्थानिकांनी सांगितलं.
मांसविक्री करणाऱ्या दुकानांना आधीच विनंती केली होती. नवरात्र काळात दुकान बंद ठेवण्याची नोटीस पाठवली होती. उघड्यावर मांस दिसत नसल्याने मांसाहारी पदार्थ विकणाऱ्या हॉटेल्सना मात्र नोटीस बजावलेली नाही, असंही शिवसेनेच्या संजय ठकराल यांनी सांगितलं.