मुंबई : हिमाचल प्रदेशमधील डलहौसीच्या काँग्रेस आमदार आशा कुमारी आणि महिला पोलिस कॉन्स्टेबलने एकमेकींना थोबाडीत मारल्याचं प्रकरण आता पोलिस कारवाईपर्यंत पोहोचलं आहे. दोघींनी एकमेकींविरोधात गुन्हा दखल केला आहे.


"मला धक्का दिला आणि परिणाम भोगण्याची धमकी दिली. मी माझ्या सरकारी ड्यूटीवर होती, तेव्हा महिला पोलिस कॉन्स्टेबलने मला माझं काम करण्यापासून रोखलं," असं काँग्रेस आमदार आशा कुमारी यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

तर महिला कॉन्स्टेबलनेही काँग्रेस आमदार आशा कुमारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलिस म्हणाली की, "मी स्वरक्षणासाठी आशा कुमारी यांच्या उलट थोबाडीत मारली होती. मी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात न्याय मिळेल असा मला विश्वास आहे."


काय आहे प्रकरण?
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलाच्या दौऱ्यावर होते. विधानसभा निवडणुकीच्या पराभवाची समीक्षा करण्यासाठी राहुल गांधी शिमल्यात आले होते. पण त्यावेळी डलहौसीच्या काँग्रेस आमदार आशा कुमारी यांनी एका महिला पोलिस कॉन्स्टेबलला थोबाडीत लगावली. प्रत्युत्तर म्हणून कॉन्स्टेबलनेही आशा कुमारी यांनी थोबाडीत मारली. "मी राहुल गांधींच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी जात होते. पण पोलिसांनी मला आत जाण्यास मज्जाव केला," असा आरोप आशा कुमारी यांनी केला.

राहुल गांधींनी फटकारल्यानंतर माफी
या प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी फटकाल्यानतंर आमदार आशा कुमारी यांनी माफी मागितली. याबाबत स्पष्टीकरण देताना आशा कुमारी म्हणाल्या की, " आम्ही राहुल गांधींसोबत विमानतळावरुन आलो होतो. गेटवर अव्यवस्था होती, काही लोक आत घुसण्याचा प्रयत्न करत होते. पास दाखवूनही महिला कॉन्स्टेबलने मला शिवीगाळ केली आणि धक्का दिला. मी जाणीवपूर्वक तिला मारलं नाही, पण त्वरित प्रतिक्रियेत हात उचलला. मी तिच्या आईच्या वयाची आहे, तरीही माझी चूक स्वीकारते. मला स्वत:वर नियंत्रण ठेवायला हवं होतं. मी माफी मागते."

स्वरक्षणासाठी थोबाडीत मारली : महिला पोलिस
"गर्दीला नियंत्रित करण्यासाठी आम्हाला तैनात करण्यात आलं होतं. यावेळी एक महिला आली आणि मी तिला रोखलं. यावर ती म्हणाली की, तुला माझी आणि माझ्या पॉवरची जाणीव नाही. त्या कोण होत्या हे मला माहित नव्हतं. त्यांनी मला तीन वेळा थोबाडीत मारलं. त्याचं प्रत्युत्तर म्हणून मी स्वरक्षणासाठी उलट थोबाडीत मारली. त्या आमदार असल्याचं मला नंतर समजलं," असं दावा महिला पोलिस कॉन्स्टेबलने केला आहे.