राजस्थान : ट्रॅक्टर स्पर्धा पाहताना छत कोसळलं, 300 जण पडले
एबीपी माझा वेब टीम | 29 Jul 2018 09:28 PM (IST)
अनेक लोक छतावर बसून या स्पर्धेचा आनंद घेत होते. यादरम्यानच छत कोसळलं आणि त्यासोबत साधारण: 300 लोक खाली पडले.
जयपूर : राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये ट्रॅक्टर स्पर्धेचे छत कोसळून जवळपास 300 लोक पडल्याची घटना घडली. या दुर्घटनेत 22 लोक जखमी झाले असून त्यातील चार जण गंभीर आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. श्रीगंगानगरच्या पदमपूरमधील या ‘ट्रॅक्टर स्पर्धे’साठी प्रशासनाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. या कार्यक्रमासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. अनेक लोक छतावर बसून या स्पर्धेचा आनंद घेत होते. यादरम्यानच छत कोसळलं आणि त्यासोबत साधारण: 300 लोक खाली पडले. प्रशासनाच्या परवानगीशिवाय कार्यक्रम झाला आहे. त्यामुळे दुर्घटनेनंतर प्रशासनाने ही चूक मान्य केली. या स्पर्धेचे आयोजन कशाप्रकारे केलं गेलं, याची चौकशी केली जाणार आहे, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. ट्रॅक्टर स्पर्धा पाहण्यासाठी दहा हजार लोक तिथं उपस्थित होते. या गर्दीचा भार सहन न झाल्यानेच छत कोसळलं.राज्य सरकारचे मंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले.