नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात पती आणि काँग्रेस खासदार शशी थरुर यांना पटियाला कोर्टाने आरोपी ठरवलं आहे. थरुर यांच्याविरोधात खटला चालवण्यात येणार असून त्यांना कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं आहे.
सुनंदा पुष्कर यांच्या आत्महत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तीन हजार पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्राच्या आधारे कोर्टाने थरुर यांना 7 जुलै रोजी कोर्टात हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे.
शशी थरुर यांनी पत्नीशी क्रूर वर्तन केल्याचा आणि सुनंदा यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. तीन हजार पानांच्या आरोपपत्रात केवळ थरुर यांच्यावरच ठपका ठेवण्यात आला आहे.
सुनंदा पुष्कर मृत्यू : थरुरांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका
सुनंदा पुष्कर यांनी मृत्यूच्या आठवडाभर आधी पतीला ईमेल केला होता. 'आपला जगण्यातील रस संपला आहे. मृत्यू यावा अशीच माझीच प्रार्थना आहे' अशा आशयाचा मजकूर सुनंदा यांनी ईमेलमध्ये लिहिल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं.
'पत्नी डिप्रेशनमध्ये असताना पती म्हणून शशी थरुर यांनी काहीच केलं नाही. सुनंदा यांच्या मृत्यूच्या काही काळ आधीही थरुर यांनी पत्नीचे फोन कट केले किंवा उचलले नाहीत. त्यांच्या शरीरावरील जखमा गंभीर नसल्या तरी दाम्पत्यामध्ये भांडणं होत असल्याचं यातून समोर येतं' असं निरीक्षण चौकशी पथकाने आरोपपत्रात नोंदवलं. त्या काहीही खात नव्हत्या, रुमबाहेर पडत नव्हत्या, असं समोर आल्याचा उल्लेख चार्जशीटमध्ये आहे.
शशी थरुर यांचे पाकिस्तानी पत्रकार मेहर तरारसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप सुनंदा पुष्कर यांनी सोशल मीडियावरुन केला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.
सुनंदा पु्ष्कर 17 जानेवारी 2014 रोजी दिल्लीतील लीला पॅलेस हॉटेलच्या 345 क्रमांकाच्या खोलीत मृतावस्थेत आढळल्या होत्या. सुनंदा यांनी 2010 मध्ये शशी थरुर यांच्यासोबत लग्न केलं होतं. हा त्यांचा तिसरा विवाह होता.