नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार शशि थरुर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो लोकसभेतील कामकाजा दरम्यानचा आहे. सोशल मीडियावर लोक शशी थरुर यांना ट्रोल करत आहेत. पण थरुर यांनी अमर प्रेम सिनेमातील प्रसिद्ध गाण्याच्या ओळी ट्विटरवर लिहून ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. "तू कौन है, तेरा नाम है क्या, सीता भी यहाँ बदनाम हुई! कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना!" असं शशी थरुर म्हणाले.






व्हायरल फोटोमध्ये फारुख अब्दुल्ला लोकसभा अध्यक्षांसमोर आपलं म्हणणं मांडत आहेत तर त्यांच्या मागे सुप्रिया सुळे आणि शशी थरुर काहीतरी बोलताना दिसत आहे. फोटोमधील शशी थरुर यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून नेटकरी त्यांना ट्रोल करण्यासाठी सरसावले आहेत. यूजर्स शशी थरुर यांची मजा घेत आहेत. त्यांचे जुने फोटो पोस्ट करत आहेत.


फोटो व्हायरल झाल्यानंतर थरुर यांनी ट्वीट करुन म्हटलं की, लोकसभेत माझ्या आणि सुप्रिया सुळे यांच्या झालेल्या संक्षिप्त बातचीतबाबत जे लोक मजा घेत आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की, "त्या मला एक प्रश्न विचारत होत्या. कारण फारुख अब्दुल्ला यांच्यानंतर बोलण्याची त्यांची वेळ होती. फारुख साहेब यांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून त्या हळू आवाजात बोलत होत्या. त्यामुळे त्या काय बोलत आहेत हे ऐकण्यासाठी मी खाली वाकलो होतो."






शशी थरुर आणि सुप्रिया सुळे आपसात बातचीत करत होते. त्यावेळी सभागृहात कामकाज सुरु होतं आणि फारुख अब्दुल्ला बोलत होते. दोघांमध्ये बातचीत होत असताना शशी थरुर हसत होते. एवढंच निमित्त झालं आणि ट्रोलर्स सक्रिय झाले. लोकांनी त्यांचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. काहींनी त्यांच्या बातचीतचा भाग एडिट करुन त्यावर पुष्पा सिनेमातील श्रीवल्ली गाणं लावलं. तर काहींनी हे चुकीचं असल्याचं म्हटलं. एखाद्याच्या प्रोफेशनल संबंधांची अशी मस्करी करु नये असंही काहींनी म्हटलं.