नवी दिल्ली : जेडीयूचे वरिष्ठ नेते शरद यादव यांनी बिहारमधील राजकीय परिस्थितीवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. महायुती तुटणं अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे, असं शरद यादव यांनी म्हटलं आहे.


बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरजेडीसोबतची युती तोडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. मात्र जेडीयूचे वरिष्ठ नेते शरद यादव यांनी या प्रकरणावर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

शरद यादव महायुती तुटल्यामुळे नाराज असल्याचीही चर्चा होती. अखेर त्यांनी महायुती तुटणं हे दुर्दैवी असल्याचं सांगितलं. एनडीएत सहभागी झाल्यानंतर जेडीयूला केंद्रातल्या सत्तेतही वाटा मिळणार आहे आणि शरद यादव हे जेडीयूचे केंद्रातील महत्वाचे नेते आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या मालमत्तांवर सीबीआयने छापेमारी केली होती.

या छापेमारीत तेजस्वी यादव यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे तेजस्वी यादव यांनी राजीनामा देण्याची मागणी जोर धरत होती.

दुसरीकडे  लालू प्रसाद यादव यांनी राजदच्या आमदारांची बैठक घेऊन, तेजस्वी यादव पदाचा राजीनामा देणार नाहीत, असं जाहीर केलं. तर तेजस्वी यादव यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना बडतर्फ करण्याचा इशारा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिला होता.

बिहारमध्ये जेडीयू, आरजेडी आणि काँग्रेसची युती आहे. या छापेमारीनंतर  गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांचं बोलणंही बंद झालं आहे. त्याचा भाग म्हणून बिहारमध्ये झालेल्या एका सरकारी कार्यक्रमाला नितीश कुमारांची हजेरी होती, पण उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दांडी मारली होती.

संबंधित बातमी :


नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक ओबीसी चेहरे


बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून बहुमत सिद्ध!