जयपूर : राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शरद यादव यांनी माफी मागितली आहे. वसुंधराराजे यांच्यासोबत जुने कौटुंबिक संबंध आहेत. माझ्या शब्दांमुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो, असे यादव यांनी म्हटले आहे. याबाबत मी त्यांना एक पत्र देखील लिहिणार आहे, असेही लोकशाही जनता दलाचे प्रमुख शरद यादव यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते शरद यादव
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याबाबत  "वसुंधरा राजे थकल्या असून खूप जाड झाल्या आहेत," असं वादग्रस्त वक्तव्य शरद यादव यांनी केलं होतं. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. "वसुंधरा राजे आमच्या मध्य प्रदेशच्या कन्या आहेत. त्यांना आता विश्रांती द्या, त्या खूपच थकल्या असून खूप जाड झाल्या आहेत, यापूर्वी त्या चांगल्या बारीक होत्या," असं शरद यादव म्हणाले होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.



वसुंधरा राजे यांनी शरद यादवांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. "राजकारणात एवढ्या खालच्या स्तरावर घसरणं हे अतियश दुर्दैवी आहे. त्यांच्या वक्तव्याने सगळ्याच महिलांचा अपमान झाला आहे. मी कुठल्याही नेत्यावर अशा प्रकारचे वैयक्तिकत टिप्पणी करत नाही. पुढच्या वेळी निवडणूक आयोगाने अशा भाषेची दखल घेतली पाहिजे," असंही त्या म्हणाल्या होत्या.

राजस्थान विधानसभेच्या 200 जागांपैकी 199 जागांसाठी आज मतदान झाले आहे.  11 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.