मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदींनी जाहीर केला. त्यावर शरद पवारांनी ट्विटवर त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
"500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. यामुळे काळ्या पैशाला आळा बसेल आणि दहशतवाद्यांना आर्थिक पुरवठा बंद होईल," असं शरद पवार म्हणाले. https://twitter.com/PawarSpeaks/status/796228131065475072
500-1000 रुपयांच्या नोटा रद्द काळ्या पैशाविरोधातील लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठं शस्त्र उगारलं आहे. पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. मंगळवार (8 नोव्हेंबर 2016) च्या मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्दबातल करण्यात येतील.
आज एटीएम बंद देशभरात आज म्हणजेच 9 नोव्हेंबर रोजी सर्व एटीएम बंद राहणार आहेत. तर 10 तारखेलाही काही ठिकाणी एटीएम बंद राहतील. एक हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द झाल्या आहेत, मात्र 100 रुपये, 50 रुपये, 20 रुपये, 10 रुपये, 5 रुपये, 2 रुपये आणि 1 रुपयाची नोट तसंच दहा, पाच, दोन आणि एक रुपयाची नाणी चलनात असतील.
सध्या पाचशे-हजारच्या नोटा कुठे चालतील? बँक आणि पोस्ट ऑफिस तुमचं खातं असलेल्या कोणत्याही बँकेत, कोणत्याही शाखेत 30 डिसेंबरपर्यंत दिवसाला 4 हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून घेता येतील. पण त्यासाठी रिझर्व्ह बँकेने जारी केलेला फॉर्म भरून द्यावा लागेल. केवळ पैसे बदलण्यासाठीच हा फॉर्म भरावा लागेल. तुमच्या खात्यात पैसे भरायचे असतील, तर या फॉर्मची गरज नाही. पैसे बदलण्यासाठी पॅन कार्ड आणि आधारकार्ड किंवा मान्यताप्राप्त ओळखपत्र सोबत असणं आवश्यक आहे.
समजा तुमच्याकडे 500 रुपयाच्या 20 नोटा म्हणजे 10 हजार रुपये असतील, तर त्यापैकी 4000 रुपयेच एका दिवसात बदलून मिळतील. म्हणजे तुमच्याकडच्या 500 रुपयाच्या 8 नोटाच बँकेत/पोस्टातून एका दिवसात बदलून घेता येऊ शकतील. परत दुसऱ्या दिवशी हीच प्रक्रिया असेल. पण तुम्ही तुमच्या खात्यावर कितीही रक्कम भरू शकता. केवळ बदलून घेण्यासाठीच 4 हजार रुपयांची ही मर्यादा असेल. 10 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरपर्यंत दिवसाला 4 हजार रुपये तुम्ही बदलून घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये वाढ होईल.
संबंधित बातम्या : एकच फाईट, वातावरण टाईट, सोशल मीडियावर विनोदांची त्सुनामी