मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 च्या नोटा बंद करण्याची घोषणा केल्यानंतर देशातील नागरिकांच्या मनात शेकडो प्रश्न उपस्थित झाले आहेत. घरातील 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचं करायचं काय असा यक्ष प्रश्न लोकांसमोर निर्माण झाला आहे. या आणि अशाच प्रश्नांनी तुम्ही देखील त्रस्त झाला असाल. पण आता काळजी करु नका. जाणून घ्या 500-1000 च्या नोटांविषयी सगळ्या प्रश्नांची उत्तरं.



1. ज्यांना तात्काळ पैसे हवे आहेत. आणि ज्यांच्याकडे 500-1000 च्या नोटा आहेत त्यांनी काय करावं?

तुम्ही तुमच्या 500-1000च्या नोटा बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून बदलून घेऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशनकार्ड किंवा मतदान ओळखपत्र तिथं दाखवणं गरजेचं आहे. जेणेकरुन तुम्हाला तुमच्या या नोटा बदलून मिळतील.

2. 500-1000च्या नोटा कशा बदलून घ्याल?

तुम्ही 500-1000च्या नोटा बँक किंवा पोस्ट ऑफिसात जाऊन ओळखपत्र (पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशनकार्ड किंवा मतदान ओळखपत्र) दाखवून एका दिवसाला 4000 रुपयापर्यंत नोटा बदलता येतील.

उदा. जर तुमच्या कडे 500च्या 20 नोटा असतील म्हणजेच दहा हजार असतील तर त्यापैकी एका दिवसाला तुम्हाला आठच नोटा (4000 रुपयांच्या नोटा) बदलून मिळतील.

3. 500-1000च्या नोटा कधीपर्यंत बदलू शकता?

500 आणि 1000च्या नोटा उद्यापासून 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2016पर्यंत बदलू शकतात. 10 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही 4 हजारपर्यंतच्या नोटा बदलता येतील. त्यानंतर 25 नोव्हेंबरपासून 30 डिसेंबरपर्यंत 4 हजारपेक्षा अधिक मर्यादा वाढविण्यात येईल.
तसेच जर तुमच्याकडे 500 ते 1000च्या नोटा असतील तर 30 डिसेंबर 2016 पर्यंत बँकेत जमाही करता येतील.

4. किती रुपयांपर्यंतच्या नोटा बदलता येऊ शकतात?

तुम्ही एका दिवसात फक्त 4000 रुपयापर्यंत 500 आणि 1000च्या नोटा बदलून घेऊ शकतात. म्हणजेच 10 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही 60,000 रु. पर्यंत नोटा बदलू शकता. 25 नोव्हेंबरपासून नोटा बदलण्याचा मर्यादेत वाढ करण्यात येईल. पण ती नेमकी किती असेल याबाबत अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही..

5. 11 नोव्हेंबरला एटीएम सुरु झाल्यानंतर किती पैसे काढू शकता?

18 नोव्हेंबरपर्यंत एटीएममधून तुम्ही दररोज 2000 रुपये काढू शकता. त्यानंतर त्याच्या मर्यादेत वाढ करण्यात येईल. तसेच बँकेतून एका दिवसात 10,000 रुपये आणि आठवड्याभरात 20,000 रुपये काढता येतील. एटीएम आणि बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा केव्हा वाढविण्यात येईल याबाबत नेमकी माहिती देण्यात आलेली नाही. पण नोटांची मागणी सामान्य झाल्यावर पैसे काढण्याची मर्यादा  वाढविण्यात येईल

6. 500 ते 1000 नोटा कुठे वापरता येतील?

रेल्वे तिकीट काउंटर, विमानतळ तिकीट काउंटर, सरकारी रुग्णालयं, पेट्रोल पंपवर (इंडियन ऑईल, एचपी, बीपी) 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा 11 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत वापरता येतील. याशिवाय सरकारी अधिकृत दूध केंद्र, शवदहन गृह येथे या नोटा 11 नोव्हेंबरपर्यंत 12 वाजेपर्यंत वापरता येतील. त्यामुळे महत्वाच्या कामांसाठी तुमची सध्यातरी अडचण होणार नाही.

7. एकाच दिवसात वेगवेगळ्या बँकांमधून नोटा बदलता येतील का?

नाही, ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे. तिथून तुम्ही नोटा बदलून घेऊन शकतो. जर तुम्ही दुसऱ्या बँकामध्ये नोटा बदलण्यास गेलात तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहिती देऊन आपलं ओळखपत्र दाखवावं लागणार आहे. ज्याचं बँकेत खातं नाही त्या व्यक्ती त्यांचे मित्र किंवा नातेवाईकांकडून लिखित मंजुरी घेऊन त्याच्या खात्यातील बँकेतून नोटा बदलून घेऊ शकतात.  

8. जर 30 डिसेंबरपर्यंत नोटा जमा नाही केल्या तर?

500 आणि 1000 च्या नोटा तुम्ही 30 डिसेंबरपर्यंत बँकेत जमा नाही करु शकलात तरीही तुमच्याकडे 31 मार्च 2017पर्यंत वेळ आहे.  रिझर्व्ह बँक यासाठी एक वेगळं सेंटर अथवा ऑफिस निश्चित करेल. जिथे जाऊन तुम्हाला प्रतिज्ञापत्र सादर करुन तुमचे पैसे जमा करावे लागतील. तसंच त्यासोबत ओळखपत्रही दाखवावं लागणार आहे.

9. कधीपर्यंत बंद राहणार एटीएम?

9 आणि आणि 10 नोव्हेंबरला एटीएम बंद राहणार

10. 500 ते 1000च्या नोटा कुठे आणि कधीपर्यंत वापरता येतील?

 
11 नोव्हेंबरपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत सरकारी रुग्णालयं, पेट्रोल पंप, विमान तिकीटं, रेल्वे तिकीटं यासाठी या नोटा वापरता येतील.

 
11. का घेतला सरकारनं हा निर्णय?

 
काळा पैसा बाहेर येण्यासाठी मोदी सरकारनं हे मोठं पाऊल उचललं.

12. नव्या 2000 आणि 500च्या नोटा कधीपासून मिळणार?
आरबीआयनं स्पष्ट केलं आहे की, नव्या 500 आणि 2000च्या नोटा या 10 नोव्हेंबरपासून बँकांमध्ये येणार आहे. तेव्हापासून त्या उपलब्ध असतील.