नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांची भेट घेतली. 7 लोककल्याण मार्ग या पंतप्रधानांच्या निवासस्थानी पवार आणि मोदी यांच्यामध्ये बैठक झाली. महाराष्ट्रातील मराठा मोर्चांसंदर्भात दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली.


मोदी-पवारांमध्ये काय चर्चा झाली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये महाराष्ट्रातील मराठा मोर्चा आणि मराठा आरक्षणावर चर्चा झाली. या दोन्ही विषयांवर संसदेत चर्चा करता येऊ शकते का, यावर मोदी आणि पवारांमध्ये चर्चा झाली.

मराठा मूक मोर्चामुळे महाराष्ट्रात एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन सुरु आहे. अत्यंत शांतपणा सुरु असणाऱ्या या मोर्चांमधून मराठा आरक्षणाची मागणीही केली जात आहे. यासंदर्भातच शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली आहे. त्यामुळे पवारांच्या चर्चेनंतर संसदेत या मुद्द्यावर चर्चा होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.