नवी दिल्ली : लष्करी अधिकारी मेजर अमित द्विवेदी यांच्या पत्नी शैलजा द्विवेदींच्या हत्येचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. शैलजा यांनी लग्नाला नकार दिल्यामुळे मेजर निखिल हांडाने त्यांची हत्या केल्याचं समोर आलं आहे.


मिसेस अर्थ... शैलजा द्विवेदी.. वय अवघं 35 वर्ष.. अर्बन डेव्हलमेंटमध्ये एमटेक, प्रचंड बुद्धिमान.. शनिवारी शैलजा द्विवेदींच्या हत्येने देश हादरुन गेला.

दिल्लीसाठी क्राईम ही नवी गोष्ट नाही. पण शैलजा द्विवेदीच्या हत्येने अख्खं पोलिस खातं कामाला लागलं. त्याचं कारण म्हणजे शैलजा लष्करी अधिकारी मेजर अमित द्विवेदी यांची पत्नी होती. आणि त्याशिवाय कारगिल युद्धात शौर्य गाजवलेल्या कॅप्टन सौरव कालिया यांची चुलत बहीण.

शैलजा शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास फिजियोथेरपीसाठी पती अमित यांच्या सरकारी गाडीनं आर. आर. हॉस्पिटलमध्ये आल्या. तिथे ट्रीटमेंट घेतली. मात्र त्यानंतर त्या एका पांढऱ्या रंगाच्या होंडा सिटीतून बाहेर पडताना दिसल्या.
ही होंडा सिटी चालवत होता मेजर निखिल हांडा.

निखिलने शैलजा यांना का संपवलं? या प्रश्नाचं उत्तर थरारक आहे.

निखिल आणि शैलजा यांचे पती अमित 2015 पासून नागालँडच्या दिमापूरमध्ये पोस्टिंगला होते. तिथं निखिल शैलजा यांच्या शेजारी राहायचा. दोघांची ओळख वाढली. यातून निखिल शैलजाच्या प्रेमात पडला.

दोन महिन्यापूर्वी अमित द्विवेदी एका ट्रेनिंगसाठी दिल्लीला आले. थोड्याच दिवसात त्यांची रवानगी यूएनच्या कार्यक्रमासाठी सुदानला होणार होती. त्यामुळे पझेसिव्ह झालेल्या निखिलने अमितला सोडून देण्यासाठी तगादा लावला. मात्र शैलजा त्यासाठी तयार नव्हत्या.

निखिलने शनिवारीही शैलजांजवळ लग्नाचा विषय काढला. पण त्या नकारावर ठाम होत्या. संतापलेल्या निखिलनं आपल्याजवळच्या चाकूनं त्यांच्या गळ्यावर वार केले. त्यानंतर शैलजा यांना रस्त्यावर फेकत अपघाताचा भास व्हावा म्हणून त्यांना गाडीखाली चिरडलं.

यानंतर निखिल हांडानं फोन स्विच ऑफ केला. तो साकेत परिसरातील आपल्या घरी गेला. फ्रेश झाला. काही कपडे गाडीत सोबत घेतले आणि थेट मेरठ गाठलं.

इकडे पोलिसांनी तोवर निखिल हांडाचा शोध सुरु केला होता. दिमापूरला पोस्टिंगवर असलेला निखिल 2 जूनपासून सुट्टीवर दिल्लीत असल्याचं समजलं. पण त्याचं लोकेशन कळत नव्हतं. शैलजा यांच्या सीडीआरवरुन त्यांचं कायम एकमेकांशी बोलणं होत असल्याचं समजलं. आणि शैलजांच्या मोबाईलवरचा शेवटचा कॉलही निखिलचाच होता.

नेहमीप्रमाणे कुठलाही हुशार गुन्हेगार एक तरी चूक करतोच, तशी निखिलनंही केली. त्यानं केवळ 58 सेकंदासाठी फोन ऑन केला. पोलिसांना लोकेशन मिळालं आणि अवघ्या काही मिनिटात मेरठ पोलिसांनी निखिलच्या मुसक्या आवळल्या.

निखिलचं शैलजावर एकतर्फी प्रेम होतं, असा दावा त्यांच्या कुटुंबानं केला आहे. पण मोबाईल रेकॉर्डनुसार गेल्या वर्षभरात दोघांमध्ये तब्बल 3 हजार वेळा बोलणं झालं आहे.

मानवी संबंध डिकोड करणं अशक्य गोष्ट आहे. त्यामुळेच अधिकारी पदावर असलेल्या निखिल हांडाचा पझेसिव्हनेस सर्वात प्रिय व्यक्तीची हत्या करण्याइतपत टोकाला गेला.

मेजर निखिल आणि शैलजा यांच्या संबंधांबद्दल दोन दिवस चर्चा होईलही. पण सर्वात कठीण काळ शैलजा यांचे पती मेजर अमित आणि त्यांच्या सहा वर्षाच्या मुलासमोर आहे. हे असं का झालं? हा प्रश्न आयुष्यभर विक्रमाच्या मानगुटीवर बसलेल्या वेताळाप्रमाणे असेल.