कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज (सोमवारी) पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथे झालेल्या सभेतील मंडल कोसळल्याने 22 जण जखमी झाले. या जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भाषण संपल्यानंतर नरेंद्र मोदींनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. ‘मिशन पश्चिम बंगाल’ची सुरुवात करत नरेंद्र मोदींनी आज मिदनापूर इथं सभा घेतली. यावेळी तिथं असलेल्या एका मंडपचा काही भाग कोसळल्याने गोंधळ निर्माण झाला. यामध्ये जवळपास 22 लोक जखमी झाले आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मंडप कोसळल्यानंतर मोदींनी त्वरित आपलं भाषण थांबवलं. तसंच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एसपीजी जवानांना जखमींची मदत करण्यासाठी सांगितलं. जखमी मुलीने ऑटोग्राफ मागितला भाषण संपल्यानंतर नरेंद्र मोदींनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. यावेळी एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. चक्क एका जखमी मुलीने मोदींकडे ऑटोग्राफ मागितला. मोदींनीही लगेच त्या मुलीची इच्छा पूर्ण करत ऑटोग्राफ दिला. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुर्घटनेतील जखमी लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना केली. ‘मिदनापूर रॅलीतील सर्व जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करते. उपचारासाठी सरकारकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल,’ असं ट्वीट त्यांनी केलं आहे.