मुंबई : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलला जोरदार झटका बसला आहे. रिलायन्स रिटेलने फ्यूचर ग्रुपसोबत केलेल्या करारावर सिंगापूरमधील लवादने बंदी घातली आहे. रिलायन्स रिटेलने फ्यूचर ग्रुपचा व्यवसाय खरेदी केल्यानंतर जेफ बेजोस यांच्या अमेझॉन कंपनीच्या याचिकेवर लवादने हा निर्णय दिला आहे.
फ्यूचर ग्रुपने रिलायन्स रिटेलसोबत 24,713 कोटी रुपयात करार करुन आपल्या व्यवसायाची विक्री केली होती. परंतु फ्यूचर ग्रुपने रिलायन्ससोबत करार करुन, आपल्यासोबत मागील वर्षी केलेल्या कराराचं उल्लंघन केलं आहे, असं सांगत अॅमेझॉनने सिंगापूरमधील लवादात याचिका दाखल केली होती. यावर दिलेल्या अंतरिम आदेशात फ्यूचर ग्रुपला आपला व्यवसाय रिलायन्सला विकता येणार नाही असं म्हटलं. सध्या या करारावर बंदी घालण्यात आली आहे.
रिलायन्स आणि फ्यूचर ग्रुपच्या करारवर अॅमेझॉनचा आक्षेप, Future Group ला नोटीस
अॅमेझॉनने मागील वर्षी किशोर बियानी यांच्या फ्यूचर ग्रुपच्या फ्यूचर कुपन्स लिमिटेड या कंपनीमधील 49 टक्के भागीदारी खरेदी केली होती. याशिवाय फ्यूचर रिटेलमधील 7.3 टक्के वाटा देखील आहे. परंतु हा व्यवसाय किशोर बियानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज 24,713 कोटी रुपयात विकला. यानंतर अॅमेझॉनने सिंगापूरच्या लवादकडे दाद मागितली होती.
यावरील सुनावणीत लवाद पॅनलने म्हटलं की, "अॅर्बिट्रेशन पॅनलची स्थापन होईपर्यंत सध्या हा करार रोखला जावा."
रिलायन्स आणि फ्यूचर ग्रुपमधील झालेल्या कराराबाबत अॅमेझॉनचं म्हणणं आहे की, "आमच्याकडे राईट ऑफ फर्स्ट रिफ्यूझल असेल, असं फ्यूचर ग्रुपसोबत झालेल्या करारात निश्चित झालं होतं. याशिवाय ही कंपनी इतर कोणत्याही प्रतिस्पर्धी ग्रुपसोबत करार करु शकणार नाही. रिलायन्ससोबत करार करताना फ्यूचर ग्रुपने या दोन्ही अटींचं उल्लंघन केलं आहे."
अॅमेझॉनने या निर्णयाचं स्वागत केलं आहे. दरम्यान आतापर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीज आणि फ्यूचर ग्रुपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. रिलायन्सकडून फ्यूचर ग्रुपचा व्यवसाय खरेदी केल्यानंतर भारतीय बाजारात स्पर्धा वाढण्याची भीती अॅमेझॉनला आहे.