मुंबई : जगातील सर्वात मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांची 'एशियन ऑफ दी इयर' म्हणून निवड करण्यात आली आहे. द स्ट्रेट्स टाईम्स ऑफ सिंगापूरने अदार पूनावालासह सहा जणांना एशियन ऑफ द इयर सन्मानासाठी निवडले आहे. यावर्षी कोविड 19 साथीच्या विरूद्ध लढा देण्यास योगदान देणाऱ्यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे.


पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, कोविड 19 लस 'कोविशिल्ट' विकसित करण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटीश-स्वीडन कंपनी अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांच्याबरोबर काम करत आहे. त्यासाठी कोरोना लसीची चाचणी भारतात घेण्यात येत आहे.


सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ची स्थापना 1966 मध्ये झाली


सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाची स्थापना 1966 मध्ये अदार पुनावाला यांचे वडील सायरस पुनावाला यांनी केली होती. अदार पुनावाला यांनी वयाच्या 30 व्या वर्षी 2011 मध्ये सीरम इन्स्टिट्युटची जबाबदारी आपल्या हाती घेतली. सीरम इन्स्टिट्युट गरीब देशांना कोरोना लसींपर्यंत पोहोचवण्यास मदत करत आहे.


अदार पुनावालाशिवाय इतर पाच जण यादीत


अदार पुनावाला यांच्यासह या सहा जणांचा समावेश आहे. चीनचे संशोधक झांग योंगझेन ज्यांनी कोरोना महामारील जबाबदार सार्स-सीओव्ही -2 च्या पहिल्या जिनोमचा शोध घेणाऱअया टीमचं नेतृत्व केलं. चीनचे मेजर जनरल चेन वई, जपानचे डॉ. युईची मोरिशिता आणि सिंगापूरचे प्राध्यापक आय इंग आंग. हे सर्व सर्वजण कोरोना लस बनवण्याच्या कामात अग्रस्थानी आहेत. या यादीमध्ये दक्षिण कोरियाचे उद्योजक सीओ जंग-जिन यांचेही नाव आहे. जिन यांची कंपनी कोरोनाची लस तयार करुन उपलब्ध करून देण्याचे काम करेल. 'द स्ट्रेट्स टाईम्स'च्या वृत्तानुसार, या सर्वांना 'द व्हायरस बस्टर्स 'हे विशेषण दिले गेले आहे, जे त्यांच्या स्वत:च्या कौशल्यानुसार कोरोना विषाणूची महामारी संपवण्याचा प्रयत्न करत आहेत.