मुंबई : 'मूडीज'नं भारताच्या रेटिंगमध्ये वाढ केल्यानंतर आज (शुक्रवार) शेअर बाजारानंही सुरुवातीलाच मोठी उसळी घेतली आहे. तब्बल 400 अंकाची उसळी घेतली आहे. आज शेअर बाजाराची सुरुवात 33,388 अंकांनी झाली आहे. तर दुसरीकडे निफ्टीमध्येही वाढ झाली आहे. निफ्टीमध्ये 100 अंकानी वाढ झाली आहे. निफ्टीची सुरुवात 10,327 अंकांनी झाली आहे.
शेअर बाजारासोबतच रुपया देखील मजबूत झाला आहे. 0.69 पैशांनी रुपया मजबूत झाला असून आज एका डॉलरची किंमत 64.63 रुपये आहे.
मूडीजच्या रेटिंगमध्ये आतापर्यंत भारताचा समावेश BAA-3 या श्रेणीत होता. तो आता BAA-2 असा करण्यात आला आहे. या नव्या रेटिंगमुळे भारताची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली पत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याआधी 2004 साली भारताचं रेटिंग वाढलं होतं. त्यानंतर तब्बल 12 वर्षांनी भारताचं रेटिंग सुधारलं आहे.
शेअर बाजार उघडताच सुरुवातीच्या तासाभरात टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी, सिप्ला यांच्या शेअर्सनं चांगली कामगिरी केली. तर विप्रो, टीसीएस, इन्फोसिस यासारख्या आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्समधील या बदलामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.