Home Minister Amit Shah : येत्या काही वर्षांत जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीएफ तैनात करण्याची आवश्यकता राहणार नाही, असे वक्तव्य गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी जम्मू येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाचा 83 वा स्थापना दिन साजरा झाला. यावेळी केंद्रीय गृहमंत्र्यांनी पथसंचलनाचे निरीक्षण देखील केले. जवानांना संबोधित करताना गृहमंत्री शाह म्हणाले की, 2014 मध्ये नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुधारली आहे. पुढील काही दिवसांत येथे सीआरपीएफ तैनात करण्याची आवश्यकता राहणार नाही.


देशाला आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षेला स्वत:पेक्षा महत्व आणि प्राधान्य देण्याची परंपरा सीआरपीएफ ने कायम ठेवली आहे, असे गौरवोद्गारही यावेळी अमित शाह यांनी काढले. हीच त्याग आणि बलिदानाची परंपरा, त्याच समर्पित वृत्तीने या दलाचे जवानही पुढे नेतील, अशी मला खात्री आहे, असे ते म्हणाले. देशातील युवा पिढीला देखील या जवानांचे समर्पण आणि त्यागाविषयी मोठा आदर आहे, असे अमित शाह म्हणाले.


जिथे कुठेही संकटाची परिस्थिती असते, तिथे, जेव्हा सीआरपीएफचे जवान पोहोचतात, तेव्हा, लोकांना पूर्ण विश्वास वाटतो, की आता ते परिस्थिती नियंत्रणात आणतील. या दलांचे कित्येक वर्षांचे परिश्रम आणि त्यांचा गौरवास्पद इतिहास यातूनच त्यांच्याविषयी हा विश्वास निर्माण झाला आहे, असे अमित शाह म्हणाले. 






नक्षलग्रस्त भाग असो किंवा मग कश्मीरमधला पाकिस्तान-पुरस्कृत दहशतवाद असो, किंवा मग ईशान्य भागात अशांतता निर्माण करणाऱ्या शक्ती असोत, या सगळ्या संकटांच्या वेळी, सीआरपीएफ ने अत्यंत स्पृहणीय कामगिरी केली आहे, असे अमित शाह म्हणाले. देशाचे पहिले गृहमंत्री, पोलादी पुरुष  सरदार वल्लभभाई पटेल यांनी याच दिवशी, 1950 साली, सीआरपीएफला आपला ध्वज दिला होता. आज सीआरपीएफ देशातील सर्वात मोठे निमलष्करी दल असून त्यात 246 तुकड्या आणि 3.25 लाख सैनिक आहेत. त्यांच्या विश्वासार्हतेसाठी ते  केवळ देशातच नाही, तर जगभरातील सर्व लष्करी दलांमध्ये ओळखले जातात, असेही गृहमंत्री यावेळी म्हणाले.