Nagaland Sokhuvi Railway Station : भारताच्या ईशान्य भागात पर्वतरांगामध्ये वसलेल्या नागालँड (Nagaland) राज्याला तब्बल 100 वर्षांनंतर दुसरं रेल्वे स्थानक (Railway Station) मिळालं आहे. शुक्रवारी 26 ऑगस्ट रोजी नागालँडमधील नवीन 'शोखुवी रेल्वे स्टेशन'वरून (Sokhuvi Railway Station) 'डोनी पोलो एक्सप्रेस'ला (Donyi Polo Express) रवाना झाली. हा दिवस नागालँडसाठी ऐतिहासिक आहे. मुख्यमंत्री नेफियू रियो यांनी नव्या 'शोखुवी रेल्वे स्टेशन'वर 'डोनी पोलो एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा दाखवला. तब्बल 100 वर्षांहून अधिक काळानंतर नागालँडला दुसरं रेल्वे स्टेशन मिळालं आहे. त्यामुळे नागालँडसाठी हा दिवस फार महत्त्वाचा ठरला. नागालँडमधील पहिलं रेल्वे स्थानक 1903 मध्ये बनलं होतं. नागालँडची राजधानी दीमापूर (Dimapur) येथे 1903 साली पहिलं रेल्वे स्थानक सुरु झालं होतं.
शोखुवी रेल्वे स्टेशनवरून सुटली एक्सप्रेस
नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रियो यांनी शुक्रवारी 'शोखुवी रेल्वे स्टेशन'वर 'डोनी पोलो एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा दाखवत रवाना केलं. डोनी पोलो एक्सप्रेस याआधी आसाममधील गुवाहाटी आणि अरुणाचल प्रदेशातील नाहरलागुन या दरम्यान चालवली जात होती. या एक्सप्रेसच्या थांब्यामध्ये वाढ करत टीमापूरपासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शोखुवी रेल्वे स्थानकावरही आता ही एक्सप्रेस पोहोचली आहे.
रेल्वे स्टेशनमुळे नागालँड थेट अरुणाचल प्रदेशला जोडला
डोनी पोलो एक्सप्रेसच्या मार्गाचा विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये शुखोवी रेल्वे स्थानकाची भर पडल्याने आता नागालँड आणि अरुणाचल प्रदेश थेट रेल्वे सेवेनं जोडले जातील. नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी ट्विट करून शुक्रवार हा नागालँडच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस असल्याचं म्हटलं आहे.
नागालँडसाठी ऐतिहासिक दिवस
नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'नागालँडसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे, राज्याला 100 वर्षांहून अधिक काळानंतर धनसारी-शोखुवी रेल्वे मार्गावर दुसरे रेल्वे टर्मिनल मिळालं आहे.' दुसरीकडे, ईशान्य फ्रंटियर रेल्वे (NFR) महाव्यवस्थापक अंशुल गुप्ता यांनी यावेळी सांगितलं की, भारतीय रेल्वे आणि NFR साठी हा अभिमानाचा क्षण आहे. NFR ईशान्येकडील राज्यांच्या सर्व राजधान्यांना रेल्वेद्वारे जोडण्याचं काम करत आहेत.