Monkeypox Cases India : जगभरात कोरोना महामारी मागोमाग आता मंकीपॉक्स विषाणूचा (Monkeypox Virus) उद्रेक होताना दिसत आहे. भारतातही आता मंकीपॉक्स विषाणू संसर्ग पसरताना दिसत आहे. राजधानी दिल्लीमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा दुसरा रुग्ण आढळला आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत राहणाऱ्या 35 वर्षीय नायजेरियन व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. या व्यक्तीने कोणतीही विदेश यात्रा केलेली नाही. दिल्लीतील मंकीपॉक्सचा हा दुसरा रुग्ण आहे. तर देशातील सहावा रुग्ण आहे. यातील तीन रुग्ण केरळमधील आहे. तर एका व्यक्तीचा मंकीपॉक्समुळे मृत्यू झाला आहे.
भारतात मंकिपॉक्सचा पहिला बळी, केरळमध्ये मंकिपॉक्सच्या रुग्णाचा मृत्यू
केरळ सरकारने आज दिलेल्या माहितीनुसार, 30 जुलैला ज्या 22 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला त्या व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाली होती. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे येथे नमुने पाठवण्यात आले होते. हा पश्चिम आफ्रिकेचे व्हेरिएंट आहे.
विजयन यांनी सांगितले की, 22 जुलैला हा व्यक्ती केरळमध्ये आला होता. त्यानंतर तब्येत बिघडल्यानंतर त्याला त्रिशूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 19 जुलैला यूएईमध्ये केलेल्या चाचणीत त्याला लागण झाली होती. परंतु नातेवाईकांनी याची माहिती रुग्णालयात 30 जुलैला दिली. केरळ सरकारकडून या संदर्भात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले.
मंकीपॉक्स 'सार्वजनिक आरोग्य आणीबाणी' घोषित
जगभरात मंकीपॉक्स विषाणूचा वाढता संसर्ग पाहता जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) मंकीपाक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानंतर भारतातील मंकीपॉक्सचे रुग्णही वाढताना दिसत आहेत. जगातील वाढता मंकीपॉक्सचा संसर्ग पाहता जागतिक आरोग्य संघटनेकडून सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख (Director-General of WHO) टेड्रोस रिसोर्सेस गेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे.