काश्मीरच्या खोऱ्यात दुसऱ्या कारगिल मॅरेथॉनचं आयोजन
एबीपी माझा वेब टीम | 02 Sep 2018 09:48 AM (IST)
सरहद संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दुसऱ्या मॅरेथॉनला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एबीपी माझाची टीम थेट कारगिलमध्ये पोहोचली आहे.
कारगिल : काश्मीरच्या खोऱ्यात आज शांतेतच्या दौडचं अर्थात मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. सरहद संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दुसऱ्या मॅरेथॉनला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एबीपी माझाची टीम थेट कारगिलमध्ये पोहोचली आहे. देशभरातील 1200 पेक्षा जास्त धावपटूंनी या स्पर्धेत सहभागी घेतला. सर्जिकल स्ट्राईकमागील मराठी चेहरा असणारे राजेंद्र निंभोरकर यांच्या हस्ते कारगिल मॅरेथॉनला फ्लॅगऑफ करण्यात आला. काश्मीर खोऱ्यात शांतता आणि एकता नांदावी हा या मॅरेथॉनमागचा हेतू आहे. कारगिल म्हटलं की आपल्याला 1999 चं युद्ध आठवतं. इथल्या महाकाय हिमालायीन पर्वतरांगांच्या साक्षीनेच भारताने पाकिस्तानच्या चिंधड्या उडवल्या होत्या. शिवाय ज्या ताशी नामग्याल या मेंढपाळाने पाकच्या सीमेवरच्या हालचालींची माहिती भारतीय लष्कराला सर्वात प्रथम कळवली होती, तेही इथलेच. पण कारगिलची ओळख केवळ युद्धभूमीपुरती मर्यादित ठेवणं हे त्यावर अन्याय केल्यासारखं होईल. सरहदचे संजय नहार हे काश्मीरसोबत अगदी 90 च्या दशकापासून जोडले गेलेत. काश्मीरमधल्या अनेक अनाथ मुलांना पुण्यात आणून ते सांभाळतायत, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करतायत. ज्या कारगिलने देशासाठी इतकं केलंय, त्यांना बदल्यात अधिक काय देता येईल या विचारातून चर्चा सुरु असताना इथं मॅरेथॉनची संकल्पना त्यांच्या डोक्यात आली. गेल्या वर्षीही काश्मीर खोऱ्यातल्या 700 ते 800 आणि बाहेरच्या जवळपास दीडशेजणांनी या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. मॅरेथॉनच्या निमित्ताने बाहेरचे अधिकाधिक लोक कारगीलमध्ये यावेत, इथलं निसर्गसौंदर्य त्यांनी पाहावं, नवनवीन ट्रेकिंग स्पॉट धुंडाळावेत, इथल्या सुफी-बुद्धिस्ट संस्कृतीला जवळून पाहावं हा आयोजकांचा उद्देश आहे.