नवी दिल्ली: पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर भाजपची राष्ट्रीय कार्यकरणीची बैठक दिल्लीत सुरु आहे. आज या बैठकीचा दुसरा दिवस असून, बैठकीमध्ये अनेक प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे अध्यक्षीय भाषण होणार असले, तरी सर्वांच्या नजरा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाकडे आहेत. पाच राज्यांच्या निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदी कोणता कानमंत्र कार्यकर्त्यांना देतील या वरच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
या बैठकीच्या पहिल्या दिवशी भारतीय जवानांनी पाक सीमेत घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईक, आणि नोटाबंदीच्या निर्णयाचीच चर्चा रंगली. भाजप अध्यक्ष अमित शाहा यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, ''मोदी सरकारच्या कार्यकाळात सैन्य दलाने उचललेले धाडसी पाऊल ऐतिहासिक होते. जर पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घालणे बंद केले नाही, तर आजूनही सर्जिकल स्ट्राईक करावे लागतील,'' असा इशारा यावेळी पाकिस्तानला दिला. तसेच सर्जिकल स्ट्राईक आणि नोटाबंदीचा मुद्दा आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.
अमित शाहांच्या मते, नोटाबंदीच्या काळात जनतेला त्रास सहन करावा लागत असतानाही, 70 हजार किमी पेक्षा अधिकच्या परिवर्तन यात्रेला जनतेने भरपूर प्रतिसाद दिला. तसेच लवकरच उत्तर प्रदेश, उत्तराखंडसोबत सर्व पाच राज्यांच्या निवडणुकीसाठीची उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.