सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा 5 टक्के कमी पाऊस : हवामान विभाग
एबीपी माझा वेब टीम | 12 Sep 2016 05:26 AM (IST)
नवी दिल्ली : देशभरात सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा 5 टक्के कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने समाधानाचं वातावरण होतं. मात्र हवामान विभागाच्या नव्या भाकितामुळे देशभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, याआधी हवामान विभागाने सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा 5 ते 6 टक्के जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र नव्या अंदाजामुळे शेतकऱ्यांसह सामान्यांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे राज्यातही सध्या पावसाने ओढ दिली आहे. तुरळक अपवाद वगळता राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मराठवाड्यातील काही भागात पावसाअभावी पिकं करपण्याच्या अवस्थेत आहेत.