पीडितेच्या वकिलांना कोर्टात येण्यापासून रोखणाऱ्या वकिलांविरोधात सुप्रीम कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त करत बार असोसिएशनला नोटीस बजावली आहे. 19 एप्रिलपर्यंत या नोटीशीचं उत्तर सुप्रीम कोर्टाने मागितलं आहे.
कठुला गँगरेप आणि हत्येप्रकरणी सुमोटो याचिका दाखल करुन घेण्यात यावी अशी मागणी सुप्रीम कोर्टातील वकिलांच्या एका समूहाने सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि डी. वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाकडे केली होती. वकिलांच्या या मागणीनंतर सुप्रीम कोर्टानेही सुमोटो याचिका दाखल करुन घेतली.
चिमुकल्या असिफावर अमानुष अत्याचार
10 जानेवारीला असिफा खेचर चारण्यासाठी कठुआजवळच्या जंगलात गेली होती. तिथून तिचं एका अल्पवयीन आरोपीनं अपहरण केलं आणि जवळच्या मंदिराच्या तळघरात लपवलं. सात ते आठ दिवस नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अमानुष अत्याचार केले. या नराधमांनी अनन्वित अत्याचारानंतर असिफाची हत्या केली.
शोधाशोध करुन थकल्यावर 12 जानेवारीला असिफाच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली.
17 जानेवारीला जंगलात असिफाचा मृतदेह अतिशय भीषण अवस्थेत आढळून आला. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून एसआयटीकडे सोपवण्यात आला. मुख्य आरोपी आणि माजी सरकारी अधिकारी संजी राम हा दोन महिने फरार होता. मार्चमध्ये संजी राम स्वत: पोलिसांसमोर हजर झाला. मेरठमधून त्याच्या मुलाला विशालला अटक करण्यात आली.
संजी रामला मदत करणं आणि असिफावर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. दोन महिन्यांनी आरोपपत्र दाखल करण्यास वकिलांनी विरोध केल्याने देशभरातून संतापाची लाट उसळली आहे.
काश्मिरात चिमुकलीची बलात्कार करुन हत्या
वकिलांचा आरोपींना पाठिंबा
धक्कादायक म्हणजे, जम्मू बार असोसिएशनने जम्मू-काश्मीर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कारवाईविरोधातच निदर्शनं केली. या बार असोसिएशनने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणी केली.
चित्रपट, क्रीडासह अनेक क्षेत्रातील दिग्गज आक्रमक
प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, संजय दत्त, सोनम कपूर, रेणुका शहाणे, फरहान अख्तर, जावेद अख्तर, रितेश देशमुख, टेनिस स्टार सानिया मिर्झा, माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर यांसह अनेक दिग्गजांनी ट्विटरवरुन तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
काँग्रेसचा कँडल मार्च
उन्नाव आणि कठुआ बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मध्यरात्री 12 वाजता दिल्लीतील इंडिया गेटवर मोर्चा काढला. बेटी पढाओ बेटी बचाओचा नारा देणाऱ्या सरकारनं महिलांवरील होणाऱ्या अत्याचारावर कठोर पावलं उचलावीत असा सल्ला राहुल गांधींनी दिला. राहुल गांधींसोबत प्रियांका गांधी, गुलाम नबी आझाद, अहमद पटेल यांच्यासह हजारोंच्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते या मेणबत्ती मोर्चात सहभागी झाले होते. नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयापासून या मोर्चाला सुरूवात होऊन रात्री 1 च्या सुमारास हा मोर्चाचा समारोप झाला.
न्याय मिळेल : मेहबूबा मुफ्ती
“असिफाला न्याय मिळवून देण्याच्या मार्गात कोणतीही अडचण येणार नाही. शिवाय, काही लोक किंवा गटांची बेजबाबदार वक्तव्य आणि कृती कायद्याच्या मार्गात अडथळा ठरणार नाही, याची खबरदारी घेऊ. योग्य ती कारवाई केली जाईल. वेगाने तपास करुन, न्याय दिला जाईल.”, असे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी ट्वीटद्वारे सांगितलं.