SBI News: कॉम्प्युटरवर काम करताना टाइपिंगचा त्रास वाचावा यासाठी अनेकजण बऱ्याचदा कॉपी पेस्ट करतात. स्टेट बँकेतील कर्मचाऱ्याने केलेल्या कॉपी-पेस्टमुळे मोठा घोळ झाला आहे. या कॉपी पेस्ट चुकीमुळे ग्राहकांच्या खात्यात चुकून 1.5 कोटींची रक्कम ट्रान्सफर झाली. एका सरकारी योजनेतील रक्कम चुकून इतर ठिकाणी कार्यरत असलेल्या 15 कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाली. 


तेलंगणा सरकारने दलित बंधू योजना सुरू केली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जात होती. एसबीआय कर्मचाऱ्याच्या घोळामुळे लोट्स रुग्णालयातील 15 कर्मचाऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 10 लाख रुपये झाले. 


हैदराबादमधील सैफाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्टेट बँकेच्या रंगारेड्डी जिल्हाधिकारी बँक शाखेच्या कर्मचाऱ्याकडून चुकून ही रक्कम ट्रान्सफर झाली. हा प्रकार 24 एप्रिल रोजी घडला. 


'द हिंदू'ने दिलेल्या वृत्तानुसार, चुकून खात्यात रक्कम आलेल्या 15 पैकी 14 जणांनी बँकेचे 10 लाख रुपये परत केले. तर, एकाने ही रक्कम परत केली नाही. रुग्णालयातील एका टेक्निशिअनने ही रक्कम परत केली नसल्याची माहिती समोर आली आहे. 


कर्मचाऱ्याकडून झालेली चूक लक्षात येताच बँकेने संबंधित रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधत. त्यांना ही रक्कम परत करण्याची विनंती केली होती. त्यापैकी 14 जणांनी ही रक्कम परत केली. तर, उर्वरित एकाचा मोबाइल बंद असल्याने  त्याच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. आता या कर्मचाऱ्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


पैसे परत न केल्याने तक्रार दाखल


आपल्या बँक खात्यात आलेली रक्कम ही एखाद्या सरकारी योजनेनुसार आली असल्याचे वाटल्याने लोट्स रुग्णालयातील टेक्निशिअन महेशने ही रक्कम जुनी देणी फेडण्यासाठी वापरली. त्याला अनेकदा विनंती करूनही बँकेचे पैसे परत न केल्याने बुधवारी भादंवि 403 नुसार तक्रार दाखल केली असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 


विशेष म्हणजे सैफाबाद पोलिसांनी चुकून 'लाभार्थी' झालेल्या महेशविरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र, ज्याच्या चुकीने हा प्रकार घडला, त्या कर्मचाऱ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. 


महेशने बँकेच्या 10 लाखांपैकी 6.70 लाख रुपये परत केले आहेत. तर, 3.30 लाख रुपये खर्च केले आहेत.