नवी दिल्ली : वर्ल्ड बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य वित्त अधिकारी पदी अंशुला कांत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वर्ल्ड बँकेच्या आर्थिक वित्त अधिकारी म्हणून निवड झालेल्या अंशुला कांत पहिल्या महिला अधिकारी आहेत. याआधी त्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.


अंशुला कांत यांच्याकडे वर्ल्ड बँकेच्या आर्थिक व्यवस्थापनाची जबाबदारी असणार आहे. "अंशुला यांच्याकडे बँकिंग क्षेत्रात 35 वर्षांहून अधिकच अनुभव आहे. एसबीआयच्या मुख्य वित्त अधिकारी असताना त्यांनी कामात तंत्रज्ञानाचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला आहे", अशा शब्दात वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी स्वागत केलं.





अंशुला कांत यांनी स्टेट बँकेत अनेक महत्त्वाच्या पदावर काम केलं आहे.  स्टेट बँकेत मुख्य आर्थिक अधिकारी असताना त्यांनी 38 बिलियन डॉलरचं उत्पन्न बँकेला मिळवून दिलं होतं. अंशुला कांत यांच्याकडे अर्थशास्त्रामध्ये ऑनर्स पदवी आहे आणि दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे.