नवी दिल्ली : राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सर्व मंत्र्यांनी आपल्या पदाची शपथ वेद हाती घेऊन घ्यावी, असे माझे स्वप्न असल्याचे वक्तव्य केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी केले आहे. यावेळी त्यांनी अमेरिकेचे उदाहरण देताना तिथले राष्ट्रपती बायबल हाती घेऊन शपथ घेतात असे सांगितले आहे. भारतामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्री संविधानाची शपथ घेतात. या वक्तव्यामुळे सत्यपाल सिंह पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

उत्तरप्रदेशमधील बागपत मध्ये आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलनात बोलताना त्यांनी वेदांचे महत्व पटवून देताना हे वक्तव्य केले. 'आपल्या सभोवतालचे अपराध आणि दहशतवादासारख्या समस्यांवर प्रभावी उपाय म्हणजे वेदातील विचार आहेत. या देशाला पुन्हा गाव मिळवून द्यायचा असेल तर आपल्या वेदांकडे पुन्हा जावे लागेल', असेही ते यावेळी म्हणाले.




सत्यपाल सिंह यांनी डार्विनने मांडलेला उत्क्रांतीचा सिद्धांत चुकीचा असल्याचा दावा यापूर्वी केला होता. आता वेदाची शपथ घेण्याच्या या वक्तव्यामुळे सिंह पुन्हा एकदा गोत्यात येण्याची चिन्हं आहेत. 'डार्विनच्या उत्क्रांतीचा सिद्धांत पूर्णत: चुकीचा आहे. माणूस माकडापासून उत्क्रांत झाल्याचा उल्लेख विज्ञान आणि इतिहासाच्या पुस्तकांतून काढून टाकायला हवा', असे वक्तव्य सत्यपाल सिंह यांनी औरंगाबादमधल्या अखिल भारतीय वैदिक संमेलनामध्ये केले होते. यावरून तीव्र विरोध करत वैज्ञानिकांनी ऑनलाइन मोहीम सुरु केली होती. लग्नाच्या मंडपात जीन्स घालून येणाऱ्या तरुणीशी कोणताही मुलगा लग्न करायला तयार होणार नाही, असं वक्तव्य देखील सत्यपाल सिंह यांनी केल्याने त्यांच्यावर टीका झाली होती. सत्यपाल यांनी यापूर्वी केलेल्या काही वक्तव्यांमुळे वादंग माजला होता. ऑक्टोबर 2015 मध्ये त्यांनी दादरी हत्याकांडाला लहानशी घटना म्हटले होते.

सत्यपाल सिंह यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. 2014 मध्ये उत्तर प्रदेशातील बागपतमधून भाजपच्या तिकीटावर ते खासदारपदी निवडून आले. 2017 मध्ये त्यांची नियुक्ती राज्यमंत्रिपदी करण्यात आली.  सिंह 1980 च्या बॅचमधील महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी होते. मुंबई पोलिस आयुक्तपदाचा राजीनामा देऊन त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती.