भारताला पुढची 10 वर्षे स्थिर आणि निर्णायक सरकारची गरज : अजित डोभाल
एबीपी माझा वेब टीम | 26 Oct 2018 07:57 AM (IST)
भारताला सक्षम बनण्यासाठी पुढे जायचं असेल तर स्थिर सरकारची गरज असल्याचं मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी व्यक्त केलंय. आघाड्यांचं सरकार हे निर्णय घेण्यासाठी सक्षम नसतं. त्यामुळे भारताला किमान 10 वर्ष तरी स्थिर सरकारची गरज असल्याचं ते म्हणाले.
नवी दिल्ली : देशात राजकीय, आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुढची दहा वर्ष एक मजबूत, स्थिर आणि निर्णायक सरकारची गरज असल्याचं मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी व्यक्त केलं. कमकुवत आघाडी सरकार हे देशासाठी वाईट असल्याचंही ते यावेळी म्हणाले. गेल्या चार वर्षात देशाची राष्ट्रीय इच्छाशक्ती जागृत झाल्याचं त्यांनी सांगितलं. ऑल इंडिया रेडिओकडून आयोजित सरदार पटेल स्मृती व्याख्यानात बोलताना अजित डोभाल यांनी हे मत मांडलं. लोकशाही ही भारताची ताकद असून ती सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. कमकुवत लोकशाहीमध्ये देशाला कमकुवत बनवणाऱ्या प्रवृत्ती असतात. या दृष्टीने भारताला पुढची काही वर्षे कमकुवत राहणं परवडणारं नाही. त्यामुळे कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं ते म्हणाले.