National Unity Day 2021 : कणखर व्यक्तिमत्व आणि राजनैतिक दूरदर्शीपणा या व्यक्तिविशेषातून एकसंध राष्ट्रनिर्मितीसाठी भरीव योगदान देणारे देशाचे पहिले गृहमंत्री, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 145 वी जयंती आहे. देशभरात हा दिवस 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. याचं औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांसाठी व्हिडिओ संदेश जारी केलाय. नमस्कार ! राष्ट्रीय एकता दिवसाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा! 'एक भारत, श्रेष्ठ भारत' यासाठी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण समर्पित करणारे सरदार वल्लभाई पटेल यांना देशभरातून श्रध्दांजली वाहिली जात आहे. सरदार पटेल फक्त इतिहासातच नाही तर सर्व भारतीयांच्या हृदयातही आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीमध्ये जी-20 शिखर संमेलनामध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे ते गुजरातमधील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.
भारत हे फक्त एक भौगोलिक स्थान नाही. आदर्श, संकल्पना, सभ्यता-संस्कृतीला मानणारं परिपूर्ण राष्ट आहे. जिथं आपण 130 कोटींपेक्षा जास्त भारतीय राहतात, तो भूभाग आपल्या स्वप्नांचा, आपल्या आकांक्षाचा अखंड हिस्सा आहे. शेकडो वर्षांपासून भारतीय समाज, परंपरामध्ये लोकशाहीचा जो मजबूत पाया उभारला त्यामुळे एक भारताची भावना समृद्ध झाली. पण या देशात राहाणाऱ्या प्रत्येकाला विकासावर लक्ष ठेवावं लागेल. तसं झालं तर देशाचा विकास होईल, असं मोदी व्हिडिओ संदेशात म्हणाले.
केंद्रीय मंत्री अमित शाह लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने 'राष्ट्रीय एकता दिवस' साजरा करण्यासाठी गुजरातमधील केवडिया याठिकाणी पोहोचले होते. तिथे त्यांनी सर्वांत आधी सरदार पटेल यांचा सर्वांत उंच पुतळा असलेल्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला (Statue of Unity) वंदन केलं. या कार्यक्रमामध्ये भारतीय हॉकी संघाचे कप्तान मनप्रीत सिंह यांच्या व्यतिरिक्त तिन्ही सैन्य दलाचे अधिकारी तसेच ऑलिम्पिकमधील वेगवेगळ्या खेळात पदकांची कमाई करणारे खेळाडू उपस्थित होते. यावेळी अमित शाह म्हणाले की, सरदार वल्लभाई पटेल यांचं जीवन सर्वांना प्रेरणा देतं.