पणजी : गोव्यातील भाजप सरकार म्हणजे भ्रष्टाचाराचं आगार आहे, असा घणाघात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सीमेवर हल्ले होत असताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर गोव्यात काय करत आहेत, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

देशावर दहशतवादी हल्ला झाला आहे आणि संरक्षणमंत्री गोव्यात राजकारण करत आहेत, हे देशाचं दुर्दैव आहे. संरक्षणमंत्र्यांना देशाच्या संरक्षणाची त्यांना अजिबात चिंता नाही, असं राऊत म्हणाले. यापूर्वीही जेव्हा-जेव्हा दहशतवादी हल्ले झाले आहेत, तेव्हा तेव्हा पर्रिकर गोव्यात होते, मोदींनी यात लक्ष घालावं, असं संजय राऊत म्हणाले.

गोव्यात आम्ही महायुती करुन भ्रष्ट भाजप सरकारचा पराभव करणार. वेलिंगकर आणि शिवसेना यांचं युती सरकार आल्यास गोव्याला लुटणाऱ्या भाजपच्या सर्व भ्रष्ट नेत्यांना तुरुंगात टाकू, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे.

गोव्यात कधीकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेले सुभाष वेलिंगकर यांनी स्वतंत्र पक्ष काढून भाजपला आव्हान दिलं आहे. त्याच वेलिंगकर यांच्या पक्षासोबत शिवसेनेनं युती केली आहे.