नवी दिल्ली : आता तुम्ही रेल्वे तिकीटाचा पीएनआर चेक केल्यास तुम्हाला संबंधित ट्रेनबाबतची बरीचशी माहिती एकत्रच मिळेल. ट्रेन किती उशिरा धावतेय, तुम्ही ज्या ट्रेनमध्ये प्रवास करणार आहात, तिथून ती किती दूर आहे, ट्रेनचा स्पीड किती यासारखी माहिती मिळणार आहे.


नवी सुविधा पुढील महिन्यापासून सुरु होणार आहे.

सॉफ्टवेअरमध्ये बदल...

रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, आयआरसीटीसी लवकरच रेल्वेचं सॉफ्टवेअर अपडेट केल्यानंतर नव्या सुविधेला सुरुवात होणार आहे.

नुकत्याच झालेल्या रेल्वे मंत्रालयाच्या एका उच्चस्तरिय बैठकीत, प्रवाशांना पीएनआर चेक करतानाच ट्रेनबाबतची संपूर्ण माहिती देण्याचं निश्चित करण्यात आलं.

पीएनआर चेक केल्यास कोणती माहिती मिळणार?

- ट्रेन किती उशिरा धावत आहे?
- ट्रेन किती वेगाने धावत आहे?
- नकाशावरील ट्रेनची पोजिशन
- ट्रेन किती वेळात कोणत्या स्टेशनवर पोहोचणार?
- ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येत आहे?
- लास्ट लोकेशन काय आहे?
- कोच नंबर, कोच कम्पोझिशन
- रस्त्यात काही बदल झाला तर त्याची माहिती

सध्या काय माहिती मिळते?

- आता पीएनआर चेक केल्यास रेल्वे भाड्याची माहिती मिळते
- ही सुविधा सुमारे सहा महिन्यांपूर्वीच सुरु केली आहे
- नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टमवर जी माहिती दिली जाते, त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत
- यामुळेच आता पीएनआरला माहितीशी जोडलं जात आहे