मुंबई : ‘आम्ही गदा उपसलेली आहे आणि ती गदा वेळोवेळी सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात पडलेली आहे, यापुढेही पडेल,’ असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर आपली भूमिका स्पष्ट केली.

केंद्र सरकारविरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर संसदेत चर्चा सुरु आहे. यावेळी एनडीमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने तटस्थ राहत सभागृहात उपस्थित राहणं टाळलं.

व्हिपचा मुद्दा निकाली

‘पक्षाने कोणताही व्हिप काढला नव्हता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकाळी दिलेल्या आदेशानुसारच आमचे सर्व खासदार आज सभागृहात अनुपस्थित राहिले,’ असं म्हणत राऊत यांनी व्हिपच्या चर्चांना उत्तर दिलं.

अविश्वास प्रस्तावाबाबत आमची भूमिका स्पष्टपणे लोकांपर्यंत पोहोचलेली आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

मोदींची गळाभेट घेऊन राहुल यांनी चूक केली नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोणतीही चूक केलेली नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी राहुल यांच्या कृतीचं समर्थन केलं आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सर्वांना धक्का देत पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली. संसदेच्या औचित्याचा भंग झाला, असं म्हणत भाजपने या गळाभेटीवर आक्षेप घेतला होता.

दरम्यान, शिवसेनेच्या लेटरहेडवर एक व्हिप जारी झाला होता. खासदार चंद्रकांत खैरे यांनी हा आपला व्हिप नसून कुणाचातरी खोडसाळपणा असल्याचं म्हटलं. काल शिवसेनेच्या लेटरहेडवर असा व्हिप जारी झाला आणि हा व्हिप सोशल मीडियावरही व्हायरल झाला.