Sanjay Raut on INS Vikrant :  आयएनएस विक्रांतसाठी जमा करण्यात आलेला निधी पीएमसी बँकेच्या माध्यमातून पांढरा करण्यात आला असल्याचा धक्कादायक आरोप संजय राऊत यांनी केला. पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांनी याआधीदेखील भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांवर आरोप केले होते. त्यानंतर आयएनएस विक्रांत प्रकरणी पुन्हा राऊत यांनी पीएमसी बँकेचा उल्लेख केला आहे. 


आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी भाजप नेते किरीट  सोमय्या यांनी काही वर्षांपूर्वी निधी जमा केला होता. त्या निधीचा अपहार झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. सोमय्या यांच्या नीलम नगरमधील कार्यालयात आयएनएस विक्रांतसाठी जमा झालेला पैसा एकत्र करण्यात आला. त्यानंतर तेथून तो वितरीत करण्यात आला असल्याचा आरोप राऊत यांनी केला. हा सगळा प्रकार मनी लाँड्रिंगचा असू शकतो. ईडी ही केंद्रीय संस्था भाजपची बटीक नसेल तर या प्रकरणी सोमय्यांवर कारवाई करतील असेही राऊत यांनी म्हटले. 


संजय राऊत यांनी नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत सांगितले की, सोमय्या यांनी देशासाठी बलिदान करणाऱ्यांच्या अपमान केला असून त्यांची कृती देशद्रोहीपणाची आहे. मात्र, देशभक्तीचे गीत गाणारे, देशभक्तीचा दाखला देणारे देवेंद्र फडणवीस यांनी देशद्रोहीपणा करणाऱ्यांची बाजू घेतली. फडणवीस यांच्या या पावित्र्याने स्वर्गीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, रज्जू भैय्या, श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा आत्मा तीळ तीळ तुटत असेल. मोहन भागवत यांनादेखील वाईट वाटत असेल असेही राऊत यांनी म्हटले. आयएनएस विक्रांतच्या या भ्रष्टाचाराची व्याप्ती मोठी आहे. आयएनएस विक्रांतसाठी देशभरातून पैसे जमा केले. आयएनएस विक्रांतसाठी 200 कोटी ठरवण्यात आले. त्याहून अधिक पैसे जमा झाले असल्याची माहिती असल्याचे राऊत यांनी म्हटले. 


भाजपवर हल्लाबोल


संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. कधी गंगाजल, कधी राम मंदिराच्या नावाखाली पैसे जमा करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. देशाचा स्वाभिमान असणाऱ्या आयएनएस विक्रांतच्या नावाखाली निधी जमवला आणि अपहार केला. भाजप नेत्यांचे मुखवटे गळून पडले असून आता भविष्यात असे आणखी घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशारा राऊत यांनी दिला. देशभक्ती, हिंदुत्वाचे मुखवटे लावून लोकांना मुर्ख बनवत आहेत. त्यांचे आता मुखवटे गळून पडत असल्याचे राऊत यांनी म्हटले.  


इतर महत्त्वाच्या बातम्या: